नगर, राहात्यात आणखी सात करोना पॉझिटिव्ह

नगर, राहात्यात आणखी सात करोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 239, 62 अहवाल वेटींगवर

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात शुक्रवारी आणखी सात करोना रुग्ण समोर आले आहेत. यात नगर शहरातील 4 आणि राहाता तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या 239 वर पोहचली असून शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत 62 स्त्राव नमुन्यांचा अहवाल येणे बाकी होते.

शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात नगर शहरातील सारसनगर येथील 67 व्यक्ती करोना बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता आलेल्या अहवालात जिल्ह्यात आणखी सहा रुग्ण करोना पॉझिटिव्ह आले. यात पुन्हा नगर शहरातील रेल्वे स्टेशन येथील 28 वर्षीय महिला, शाहूनगर, केडगाव येथील 34 वर्षीय महिला आणि गजानन कॉलनी, एमआयडीसी नगर येथील 48 वर्षीय पुरूषाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले.

याशिवाय, राहाता येथील 40 वर्षीय, 56 वर्षीय आणि 32 वर्षीय पुरुष असे तिघे बाधित आढळले. यामुळे दिवसभरात जिल्ह्यात सात नव्याने करोनाचे रुग्ण वाढले आहेत.
नगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील महिलेला आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने ती दवाखान्यात दाखल झाली होती. केडगाव येथील महिला यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. एमआयडीसी भागातील बाधित व्यक्ती सारीची लक्षणे जाणवल्याने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. राहाता शहरातील तिघेही बाधित हे यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

अ‍ॅक्टिव्ह केसेस 61
जिल्ह्यात सध्या करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेस 61 आहेत. याशिवाय आतापर्यंत नगर महानगरपालिका क्षेत्र 54, उर्वरित जिल्हा जिल्हा 124, इतर राज्य 3, इतर देश 8 आणि इतर जिल्हे 50 असे करोना बाधितांची संख्या 239 वर पोहचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत 3 हजार 231 स्त्राव तपासणी केले आहेत. यातील 2 हजार 901 निगेटिव्ह आले असून शुक्रवारी रात्रीपर्यंत 62 अहवाल येणे बाकी होते.

आणखी सहा रुग्णांना डिस्चार्ज
शुक्रवारी जिल्ह्यातील 6 रुग्णांनी करोनावर मात केली. यापैकी 5 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला तर एका व्यक्तीला कोपरगाव येथून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली, माळीवाडा येथील 3, श्रीरामपूर 1, आणि संगमनेर येथील एक अशा 5 व्यक्तींना बूथ हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 167 झाली आहे.

नवनागापूर, वडगाव गुप्ता सील
नवनागापूर मधील गजानन कॉलोनीत करोना रुग्ण आढळल्याने नवनागपूर तसेच वडगाव गुप्ता परिसरात घबराट पसरली आहे. नवनागापूर व वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीने त्वरित गावातील मुख्य रस्ते बंद करून दोन्ही गावे सील केली. या भागातील अत्यावश्यक सेवासह सर्व व्यवहार पुढील काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. येथे सापडलेला रुग्ण हा अत्यावश्यक रुग्ण सेवेतील असल्याने त्यांचा परिसरातील अनेक लोकांशी संपर्क आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नवनागपूर व वडगाव गुप्ता परिसरातील जवळपास सत्तर टक्के लोक एमआयडीसीमध्ये कामाला जात असल्याने त्यांना आता कामावर जाणे अवघड होणार. दरम्यान दोन्ही गावात घबराटीचे वातावरण असून ग्रामस्थांनी शासनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने दिल्या आहेत.

संपर्कातील 17 जण क्वारंटाईन,परिसरात निर्जंतुकीकरण

राहाता (तालुका प्रतिनिधी)– राहाता शहरातील आणखी तिघा जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने राहाता शहरात एकूण करोना बाधीत रूग्णांची संख्या चार झाली आहे. 28 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी राहाता शहरातील बोठे गल्लीतील एक रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता त्याच्या संपर्कात आलेले एकूण 31 जणांची वैद्यकीय चाचणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांच्या पैकी काल सोमवारी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 28 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून या तीन जणांच्या संपर्कातील व त्यांच्या कुटूंबातील 17 जणांना वैद्यकीय कर्मचारी व पालिका कर्मचार्‍यांनी शिर्डीतील आश्रमात विलगीकरण केले आहे.

क्वारंटाईन केलेल्यांचे घशाचे स्त्राव तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्या पैकी त्याच परिसरातील तीन जणांना करोनाची बाधा झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यात 40 वर्षीय, 56 वर्षीय आणि 32 वर्षीय पुरुष असे तिघे बाधित आहेत. राहाता येथील 31 तर तालुक्यातील इतर दोन जण असे एकुण 33 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले त्यात तिघे पॉझिटीव्ह तर 30 अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत अशी माहीती राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

जे नवीन तीन करोनाबाधीत रुग्ण आढळले त्यांचे कुटूंबीय तसेच संपर्कातील लोकांची माहिती घेत प्रशासनाने 17 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत राहाता तालुक्यात करोना बाधितांची संख्या 21 झाली आहे. या पैकी 10 बरे झाले आहेत तर एका करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर इतरांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात आता 11 अ‍ॅक्टीव्ह केसेस असल्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.

करोनाबाधित रुग्ण जेथे आढळले तो शहरातील परिसर आता पत्रे लावून सील करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे. रस्त्यावर बँरीगेट लावून बंद केलेले रस्ते काही नागरीक खुले करून बाहेर पडतात अशांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी तहसिलदारांनी दिले. संध्याकाळी तहसिलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक भोये, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, पालिका कार्यालय अधिक्षक जगताप यांनी लॉकडाऊन केलेल्या परिसराची पाहणी केली.

दरम्यान, नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भेट दिली. तसेच बाधित सापडलेला परिसर निर्जंतुकीकरण केला. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने मास्क वापरावा आणि सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पिपाडा यांनी केले आहे.

सार्वमतच्या बातमीची दखल
ज्या परिसरात करोनाचे रूग्ण आढळले तो संपूर्ण परिसर काल पालिकेने सिलबंद केला आहे. तसेच पोलिसांनीही या परिसरात गस्त सुरू केली असून शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत वस्तूस्थीती मांडल्याबद्दल सार्वमतला धन्यवाद दिले आहे. सार्वमतच्या वृत्तानंतर करोना रूग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आला.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com