मुंबईचे आणखी तीन पाहुणे पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

मुंबईचे आणखी तीन पाहुणे पॉझिटिव्ह

Sarvmat Digital

  नगर, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यातील रुग्ण : बाहेरून आलेल्या बाधितांचा आकडा 19
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या आणखी तीन व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या 19 व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत तर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 75 इतकी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानूसार बाधीत आढळून आलेल्या व्यक्तींमध्ये मुंबईतील भोईवाडा, परळ येथून नगर तालुक्यातील पिंपळगाव रोड, चास येथे आलेली 24 वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे आलेली 32 वर्षीय व्यक्ती आणि भाईंदर येथून श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आलेल्या तीस वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला काल बाधित आढळून आलेल्या रुग्णाची पत्नी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
दरम्यान, रात्री आलेल्या अहवालात उर्वरित 16 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सकाळच्या सत्रात समोर आलेल्या तपासणी अहवालात नगर शहरातील 4, भिंगार कॅम्प परिसारातील 4, श्रीगोंदा तालुक्यातील 3, कर्जत तालुक्यातील 2, श्रीरामपूरमधील 1, नेवासा तालुक्यातील 1, पाथर्डीमधील 1 असे जिल्ह्यातील 16 व औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील 1 असे एकूण 17 अहवाल निगेटिव्ह आले होते.

समशेरपूर येथे अकोले तालुक्यातील तिसरा करोना बाधित सापडला

अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून आज सलग तिसर्‍या दिवशी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आता तीन झाली आहे. हे तिन्ही रुग्ण मुंबई येथून आपल्या मूळगावी आलेले आहेत. समशेरपूर येथे आज सापडलेला रुग्ण पाच सहा दिवसांपासून समशेरपुरमध्ये होता. त्यामुळे समशेरपूरकरांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

दिनांक 19 मे रोजी मुलुंड मुंबईहुन आपल्या स्वतःच्या टेम्पोने समशेरपूर येथे आला होता. त्या 39 वर्षीय तरुणाला गेल्या काही दिवसापासून श्वसनाचा त्रास होत होता. तो मुंबईत रिक्षा चालक असल्याची माहिती पुढे आली असून या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी परिसरात वार्‍या सारखी पसरल्यावर परिसरात शुकशुकाट झाला असून तीन किलोमीटरचा परिसर पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व बाजूनी गावाच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. यासाठी गावातील काही खाजगी डॉक्टरांकडे त्याने उपचार घेतले होते. पण मग त्याला कव्हरंटाईन का करण्यात आले नाही.

असा सवालही उपस्थित झाला आहे. दरम्यान सदर रुग्ण हा 19 मे रोजी आला तेंव्हा त्याला फारसा त्रास होत नव्हता.पण काल मंगळवारी तो आल्यावर त्याची तपासणी केली असता त्याला श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्याची प्रकृती खालावली होती. त्याला दम लागत होता.त्यामुळे त्याला काल सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समशेरपूर येथील आरोग्य विभागाने शासकीय रुग्णवाहिकेतून नाशिक येथील सरकारी रुग्णालयात हलवल्याची माहिती समशेरपूर ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. व्ही. भारमल यांनी दैनिक सार्वमतशी बोलताना दिली.

संबधीत करोना बाधिताच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कालपासून अगस्ती विद्यालयात विलगीकरण कक्षात ठेवले असुन त्यांची आरोग्य तपासनी केली जात आहे. त्याचे कुटुंबातील बाधीतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे वतीने कामगार तलाठी कांबळे हे काम पहात आहेत. समशेरपूर येथे काल मंगळवारी सायंकाळी नाशिक सिव्हिल रुग्णालयाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. प्रशासनाचे वतीने काळजी घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले असल्याचे समशेरपूर वार्ताहराने कळविले आहे.

दरम्यान तहसीलदार मुकेश कांबळे व तालुक आरोग्य अधिकारी डॉ इंद्रजित गंभीरे यांनी समशेरपूर येथील आरोग्य यंत्रणेकडून कमी व अधिक आजारी असणार्‍या रुग्णांची यादी मागविली आहे.त्यादृष्टीने यादी बणविण्याचे काम सुरू झाले आहे.या करोना बधिताच्या संपर्कात किती लोक आले ,तो कुठे कुठे फिरला याचीही माहिती आरोग्य यंत्रणा घेत आहे. अकोले तालुक्यातील रुग्णाची संख्या आता तीन वर गेली आहे.हे तिन्हीही रुग्ण मुबंई च्या वेगवेगळ्या भागातून तालुक्यात आले आहे,त्यामुळे मुबंईकरांमुळे सध्या तरी तालुक्याची डोकेदुखी वाढत चालल्याचे चित्र आहे.

लिंगदेव येथील त्या बाधित शिक्षकाच्या सानिध्यात आलेल्या दहा पैकी उर्वरित तीन जणांचे रिपोर्ट आज जिल्हा रुग्णालयाकडून तालुका प्रशासनाला प्राप्त झाले असुन सुदैवाने तेही निगेटिव्ह आले असल्याने लिंगदेवकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

वडाळ्यात करोनाचा तिसरा रुग्ण

वडाळा महादेव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे दोन दिवसात दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर एका करोनाबाधित रुग्णाच्या पत्नीचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. पहिल्या दोन रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघा जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका 30 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

औरंगाबादहून वडाळ्याच्या आश्रमात आलेल्या एकाला करोना असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुंबईहून वडाळा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आलेल्या मुंबईच्या एका अभियंत्यास करोना असल्याचे उघड झाले. लागोपाठ दोन करोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने सर्वत्र घबराट पसरली होती. त्यात चार जणांचे घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचे रिपोर्ट आले असून त्यापैकी तिघांची रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला मात्र मुंबईहून आलेल्या अभियंत्याच्या पत्नीचा रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने वडाळा येथील करोना बाधितांची संख्या तीन झाली आहे. आता पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील महिलेचा अहवाल बाकी आहे. तर रिक्षाचालकास विलीगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

शिरसगाव हद्दीत असणार्‍या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुमारे 225 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, गुजरात या ठिकाणाहून आलेल्या लोकांचा समावेश आहे. त्यापैकी 39 जणांना क्वारंटाईन सेंटरमधून घरी पाठवण्यात येणार आहे. त्यांना 10 दिवस या सेंटरमध्ये पूर्ण झाले. त्या 39 जणांना आता त्यांच्या घरी पाठवण्यात येणार असून आणखी सात दिवस घरी क्वारंटाईन रहावे लागणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

दरम्यान, वडाळा महादेव परिसरात उपाययोजनेबाबत प्रशासन सज्ज झाले आहे. ग्रामपंचायतीकडून जि.प. शाळेतील विलगीकरण कक्षात तर नेवासा रोडवरील अध्यात्मिक पंथीय आश्रमामध्ये औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच व्यावसायिकांना प्रशासनाच्यावतीने सूचना देऊन नागरिकांनाही गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com