जिल्ह्यात करोनाचे 2 बळी, 14 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात करोनाचे 2 बळी, 14 पॉझिटिव्ह

मृतांत नगरच्या जुळ्यांना जन्म देणार्‍या मातेचा आणि संगमनेरातील वृध्दाचा समावेश

महिलेच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी टास्क फोर्स

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात शुक्रवारी करोन बाधितांच्या संख्येचा उद्रेक झाला आहे. दिवसभरात दोन टप्प्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 14 करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे करोना बाधितांचा आकडा 117 वर पोहचला असून नगरच्या प्रसृती झालेल्या करोना पॉझिटिव्ह महिलेचा आणि संगमनेर तालुक्यातील एका वृध्दाचा मृत्यू झाला आहे. यातील महिलेच्या मृत्यूच्या कारणाचा शोध आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय टास्क फोर्स करणार आहे. दरम्यान उपचार सुरू असणार्‍यामध्ये देखील सात रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आलेले आहे. दरम्यान नगरची एक व्यक्ती पुण्यामध्ये पॉझिटिव्ह आढळली.

दुसरीकडे काल जिल्ह्यातील चौघांनी करोनावर मात केली असून त्यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यात दोघे संगमनेर तर दोघे नगर शहरातील असून आतापर्यंत 62 रुग्ण बरे झालेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 11 करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून यात जिल्ह्यातील 8 तर मुंबईच्या तिघांचा समावेश आहे.
शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या करोना तपासणी प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात 9 व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यातील बहुतांशी व्यक्ती या बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत.

यात घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले एक, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला एक, चाकण (पुणे) येथून ढोरजळगाव शेवगाव येथे आलेला एक, संगमनेर तालुक्यातील दोन आणि निमगाव (ता. राहाता) येथील चौघांचा समावेश आहे. निमगाव येथील चार व्यक्ती यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील असून या बाधित रुग्णामध्ये वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे. तसेच घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कात आली होती. चाकण येथून ढोरजळगाव (ता. शेवगाव) येथे आलेला 30 वर्षीय युवक बाधित झाला आहे.

काल सायंकाळी आलेल्या अहवालात राशीन (कर्जत) येथील 53 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली आहे. पुण्यास नोकरीला असणार्‍या पत्नीस भेटून आला होता गावी परत आला होता. घाटकोपरहून टाकळीमिया (राहुरी) येथे आलेल्या 17 वर्षीय मुलीला करोनाची लागण झालेली आहे. यापूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेची ती नातेवाईक आहे. निमगाव (राहता) येथील बाधीत महिलेचा 20 वर्षीय नातवाला कोरोनाची बाधा झाली आहे. सायन (मुंबई) येथून केलुगण (ता. अकोले) येथे आलेल्या 40 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झालेल आहे. सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून काम करत आहे. जिल्हा रुग्णालयाने जिल्ह्यातील करोना संशयीतांच्या 2 हजार 277 स्त्रावांची तपासणी केली आहे. यात 2 हजार 97 निगेटिव्ह तर 25 रिजेक्टेड आणि 15 नमुन्यांचे निष्कर्ष न निघालेले नाही. अद्याप 21 येणे बाकी आहे.

जुळ्याना जन्म देणार्‍या बाधित मातेचा मृत्यू
गुरूवारी जुळ्या बाळांना जन्म देणार्‍या करोनाग्रस्त महिलेने शुक्रवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. प्राण सोडण्यापूर्वी महिलेने बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवल्याचे ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. मुंबईतील चेंबूर येथे असलेल्या या महिलेला तिचा पती निंबळकला घेऊन आला होता. त्रास होऊ लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ती करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. गुरूवारी या महिलेची प्रसृती होवून तिने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही बाळांसह संबधित मातेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. हे तिघे आयसीयूमध्ये असतांना. करोनाबाधित असलेल्या या महिलेला शुक्रवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या या महिलेचा मृत्यू झाला. तिला निमोनियांची लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.

मृत्यूचे गुढ टास्क फोर्स उकलणार
गुरूवारी जुळ्या मुलांना जन्म देणार्‍या करोना बाधीत महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचे गुढ जिल्हास्तरीय टास्क फोर्स शोधणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या महिलेचे गुरूवारी सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत ठीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आतापर्यंत 11 मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे 8 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. यात जिल्ह्यातील आठ रुग्णांचा तर मुंबईहून जिल्ह्यात आलेल्या तिघांचा यात समावेश आहे. दुसरीकडे सध्या नगरला उपचार घेणार्‍यामध्ये 7 रुग्णांवर जिल्हा रुग्णायातील आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.

118 पॉझिटिव्ह
जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्र 18 आणि उर्वरित जिल्ह्यात 61 करोनाचे रुग्ण आहेत. तर इतर राज्य 2, इतर देश 8 इतर जिल्हा 29 करोना बाधित आहेत. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह केसेस 42 असून 2 नाशिकमध्ये तर 1 पुण्यात उपचार घेत आहे.

संगमनेरात महिला बाधीत, काही भाग सील

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- शहरातील मदिनानगर परिसरात राहणार्‍या एका 55 वर्षीय वृद्धाचा करोनामुळे शुक्रवारी मृत्यू झाला आहे. सदर करोना बाधीत रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचबरोबर त्याच परिसरात एक 40 वर्षीय महिला करोना बाधीत आढळली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोना बाधीत होवून बळी गेलेल्यांची संख्या 5 झाली आहे. तर एकूण बाधीतांची संख्या 32 वर गेली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने दिल्लीनाका ते मदिनानगर परिसर प्रतिबंधीत केला असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. नगर पाठोपाठ संगमनेरमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची जबाबदारी आता वाढली आहे.

नगर जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. संगमनेर दुसर्‍या स्थानावर आले आहे. त्यामुळे संगमनेर शहरासह तालुक्यात जोखीम वाढली आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या सलग तिन दिवस करोना रुग्णांची संख्या संगमनेरमध्ये दिसून आली. त्यात काल एकाचा मृत्यू झाला आहे.

मदिनानगर येथे राहणार्‍या एका 55 वर्षीय व्यक्तीला गुरुवारी श्वासनाचा त्रास होवू लागल्याने त्यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला करोना सदृष्य लक्षणे दिसू लागल्याने तातडीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सूचनेवरुन त्या व्यक्तीला तात्काळ अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्या व्यक्तीचा स्वॉब घेण्यात आला.

सदर स्वॉब तपासणी करीता राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आला होता. काल शुक्रवारी त्याचा वैद्यकीय चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान काल दुपारी सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तर मदिनानगर परिसरातीलच एका 40 वर्षीय महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान प्रशासनास माहिती प्राप्त होताच प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्ण आढळलेल्या मदिनानगरसह अलका नगर, भारत नगर, पठारे वस्ती, जोर्वे नाका, रहेमतनगर, डोंगरे मळा, फादरवाडी, जुना जोर्वे रोड, नवीन जोर्वे रोड हा परिसर प्रशासनाने सील केला आहे. करोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींना प्रशासनाने ताब्यात घेत त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे.

निमगाव कोर्‍हाळेच्या भाजी विक्रेत्या महिलेच्या कुटुंबातील 6 जणांना बाधा

राहाता बाजार समिती बंद, 200 कर्मचारी, व्यापारी, हमाल-मापाडी यांची तपासणी

शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील करोनाबाधित भाजी विक्रेत्या महिलेच्या कुटुंबातील आणखी चार जण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे करोना बाधितांची संख्या निमगाव कोर्‍हाळेत सहा तर राहाता तालुक्यात 7 अशी झाल्याची माहिती राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
बुधवारी सायंकाळी निमगाव कोर्‍हाळे येथील एका भाजी विके्रत्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिने शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात सलग चार दिवस उपचार घेतले होते.

तिचे शिर्डीतील नातेवाईकाकडेही वास्तव्य झाले होते. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबातील सहा जण, साईबाबा रुग्णालयात उपचार घेताना संपर्कात आलेले बारा जण, शिर्डीतील नऊ नातलग व सावळेविहीर येथे उपचार करणार्‍या एका डॉक्टरासह 27 व्यक्तींना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते. यातील हायरिस्क असलेल्या या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्त्राव प्राधान्याने तपासण्यात आले. त्यात या महिलेचा पती, एक मुलगा, सून व नातू-नातीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. एकूण 15 जणांपैकी 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून पाच जणांना करोना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काल शुक्रवारी दि. 29 मे रोजी सकाळी नऊ वाजता तालुका प्रशासनाला हे अहवाल प्राप्त झाले आहेत. या महिलेच्या एका मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो साईबाबा रुग्णालयात नोकरीस आहे. मात्र तो 20 मे पासून कामावर आलेला नाही. या कुटुंबातील एक महिला शिर्डीत येऊन राहिली होती. तिचा अहवाल निगेटिव्ह आला. पण तिच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

काल शुक्रवारी सकाळी अहवाल प्राप्त होताच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़. प्रमोद म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह वैद्यकीय टीमची आता पुन्हा बैठक होत आहे. यात पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

साईबाबा रुग्णालयात उपचार घेताना संपर्कात आलेले बारा जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी असून यातील किती जण पॉझिटिव्ह व निगेटिव्ह येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिर्डीत राहणारे त्यांचे नातेवाईक व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचेही तहसीलदार श्री. हिरे यांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com