करोना बाधितांची वाटचाल शतकाकडे !

jalgaon-digital
9 Min Read

आणखी पाच पॉझिटिव्ह : राहुरी, राहाता, अकोले, पारनेर व नगर शहरातील बाधितांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात बुधवारी आणखी पाच करोना बाधित व्यक्तींची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यात आलेल्या अशा एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 99 झाली आहे. जिल्ह्यातील मूळच्या रहिवासी असणार्‍या 75 व्यक्तींना करोनाची लागण झाली असून त्यात बाहेरच्या 24 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्याची वाटचाल धोक्याच्या दिशेने सुरू होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये बुधवारी 54 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात आणखी पाच व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात घाटकोपर मुंबई येथून टाकळीमिया (ता. राहुरी) येथे आलेली 35 वर्षीय महिला, भिवंडी येथून नगर शहरातील दातरंगे मळा येथे आलेला 60 वर्षीय व्यक्ती, ठाणे येथून पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडे येथे आलेला 46 वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून पिंपळगाव अकोले येथे आलेली 66 वर्षीय महिला आणि राहता तालुक्यातील शिर्डी जवळील निमगाव येथील 55 वर्षीय महिला यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

दरम्यान परजिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे तसेच सार्वजनिक संपर्क टाळावा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह व इतर आजार आहेत त्यांनी सर्दी, खोकला किंवा इतर आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 2 हजार 153 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासले असून त्यापैकी 2 हजार 11 निगेटिव्ह आले आहेत. तर 15 स्त्राव नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही. 11 व्यक्तींचे अहवाल रिपीट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 33 जण उपचार घेत असून तीन जण नाशिक येथे उपचार घेत आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

करोनाबाधित महिला टाकळीमियाची नसून घाटकोपरची
घाटकोपर येथून आलेली एक महिला पॉझिटिव आली असून, इतर आजार असल्यामुळे शस्त्रक्रिया करणेकामी घाटकोपर वरून डायरेक्ट जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे आली होती.कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी स्वाब घेतला जातो त्यानुषंगाने सदर महिलेचा स्वाब घेतला असता ती पॉझिटिव्ह आलेली आहे. ती जरी मुळ टाकळीमिया तालुका राहुरी येथील असली तरी सदर महिला घाटकोपर येथे स्थायिक असून शस्त्रक्रिया करणेकामी घाटकोपर येथून सरळ जिल्हा रुग्णालयात आलेली आहे. सदर महिला टाकळीमियामध्ये आलेली नाही. तरी सर्वांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
– फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

वडाळ्याचे आठजण क्वारंटाइन
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा येथील करोना बाधित अभियंत्याच्या घरातील आठ सदस्यांना कारंटाइन करण्यात आले आहे. येथील एका पाठोपाठ एक असे तिघांना करोना झाल्याने नागरिकांत चितेंचे वातावरण आहे. तसेच पहिली करोनाबाधित निघालेली व्यक्ती ज्या औरंगाबाद येथील धार्मिक केंद्रातून आली होती. तेथील पाचजणांचा करोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.

निमगाव कोर्‍हाळेतील भाजी विक्रेत्या महिलेला करोना

शिर्डी (प्रतिनिधी)– राहाता तालुक्यातील शिर्डी शहरानजीकच असलेल्या निमगाव कोर्‍हाळे येथील एक भाजी विक्रेती 53 वर्षीय महिलेचा करोनाचा अहवाल काल पॉझिटीव्ह आला आहे. या भाजी विक्रेती महिलेच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध प्रशासन घेत आहे. राहाता तालुक्यातील हा दुसरा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

निमगाव कोर्‍हाळे येथील भाजी विक्रेती महिलेस गेल्या दोन तीन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे तिला तपासणीसाठी प्रथम 19 मे रोजी सावळीविहिर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी तपासणीत करोना संशयित असल्याचे आढळून आल्याने त्या महिलेस नगर येथे हलविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्या महिलेस नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या महिलेची तपासणी करण्यात आली व घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल काल पॉझिटीव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

या महिलेचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आल्याचे समजताच प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी खडबडून जागी झाली. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी गोकूळ घोगरे यांच्यासह अधिकार्‍यांनी तातडीने निमगाव कोर्‍हाळे गाठले. त्या महिलेच्या घरी जावून त्या महिलेच्या घरात किती लोक राहतात आणि ही महिला किती जणांच्या संपर्कात आली याची माहिती घेण्याचे काम प्रशासकीय अधिकारी व पोलीस घेत होते.

या महिलेच्या घरात दहा ते पंधरा जणांचे कुटुंब असून या सगळ्यांची तपासणी करत त्यांना क्वारंटाईन करण्यात येवून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ही महिला गावातच नव्हे तर निमगाव कोर्‍हाळे परिसरातील चार ते पाच गावांमध्ये जावून भाजी विक्री करत होती. त्यामुळे ही महिला किती लोकांच्या संपर्कात आली याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. प्रशासनाच्या वतीने ह महिला किती लोकांच्या संपर्कात आली होती याची माहिती घेण्यात येत आहे.

यावेळी निमगाव कोर्‍हाळेच्या सरपंच शिल्पाताई कातोरे, उपसरपंच अजय जगताप, माजी सभापती हिराबाई कातोरेे, ग्रामविकास अधिकारी आर. के. गायकवाड, सावळीविहिर उपकेंद्राचे डॉ. श्रीधर गागरे यांनी गावात जावून गाव सील करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या सहकार्याने गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, डॉ.प्रमोद म्हस्के, तालुका वैद्यकीय अधिकारी गोकूळ घोगरे यांनी नागरिकांना आवाहन केले की, घरातच सुरक्षीत थांबा, कुणीही घाबरुन जावू नका, सगळ्यांनी स्वतःची काळजी स्वतः घ्या, करोनाचा शिरकाव यापुढे होणार नाही याबाबत सतर्क रहा असे आवाहन करण्यात आले. गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.

राहाता तालुक्यात दुसरा रुग्ण
करोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडविला असून राहाता तालुक्यात पहिला रुग्ण लोणी येथे आढळून आला. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी व नागरिकांनी विशेष काळजी घेत राहाता तालुक्यात करोना शिरकाव करणार नाही याची काळजी घेतली होती. बर्‍याच दिवसाच्या कालावधीनंतर काल निमगाव कोर्‍हाळे या ठिकाणी 53 वर्षीय महिला करोनाबधीत आढळून आल्याने राहाता तालुक्यातील हा दुसरा रुगण् असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

डॉक्टरसह 12 जण क्वारंटाइन
या महिलेने सावळीविहिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले होते. तेथे ज्या डॉक्टरांनी तपासले त्यांच्यासह या बाधित महिलेच्या कुटुंबातील 10ते 12 जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सावळीविहिर व निमगावात लॉकडाऊन
निमगावातील भाजी विक्रेती महिलेस करोनाची बाधा झाल्याने सावळीविहिर आणि निमगावात पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपळगाव खांड येथे करोना बाधित सापडला

अकोले तालुक्यातील रुग्णांची संख्या तीन

अकोले (प्रतिनिधी)– अकोले तालुक्यात करोनाबधितांची संख्या चार पर्यंत पोहचली आहे. काल बुधवारी पिंपळगाव खांड येथील एका 66 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला 17 मे रोजी मुबंईच्या घाटकोपर येथून आली होती. पिंपळगाव खांड येथे सापडलेली महिला रुग्ण ही व तिचे कुटुंब गेल्या दहा दिवसांपासून जि. प. प्राथमिक शाळा पिंपळगाव खांड येथे क्वारंटाइन केले होते.

मंगळवारी तिला त्रास जाणवू लागल्याने पिंपळगाव खांड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. गुजर यांनी तिची तपासणी केली. जुलाब, उलट्या, मळमळ, डोकं दुखत असल्याने ती तपासणीसाठी आली होती असे डॉ गुजर यांनी सांगितले. करोनाची लक्षणे जाणवत असल्याने कोतुळ ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कानवडे यांनी रुग्णवाहिकेतून तिला जिल्हा रुग्णालयात पाठविले होते.मंगळवारी तिचा स्वाब घेतला गेला. व तिला घरी पाठविण्यात आले होते.त्याचा रिपोर्ट काल रात्री प्रशासनाला प्राप्त झाला. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी या बाधित महिला व तिच्या कुटुंबातील सात सदस्यांना तातडीने नगरला पाठविले आहे.

या महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरल्यावर परिसरात शुकशुकाट झाला आहे. स्थानिक करोना सुरक्षा समितीचे सदस्य यांनी गावात खबरदारीचा उपाय म्हणून सुचना केल्या आहेत. आज गुरुवारपासून गावातील दूध संकलन, छोटी मोठी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस पाटील नारायण डोंगरे व समितीचे विश्वनाथ महाराज शेटे यांनी सार्वमतशी बोलतांना दिली.

अकोले तालुक्यातील लिंगदेव,ढोकरी ,समशेरपूर पाठोपाठ आता पिंपळगाव खांड येथे महिला बाधित झाल्याचे निष्पन्न झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णाची संख्या आता चार वर गेली आहे.हे चारही रुग्ण मुबंई च्या वेगवेगळ्या भागातून तालुक्यात आले आहे, त्यामुळे मुबंईकरांमुळे सध्यातरी तालुक्याचे टेन्शन दिवसेंदिवस अधिकच वाढत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

घुलेवाडीचा डॉक्टर पॉझिटिव्ह

संगमनेर (प्रतिनिधी) – सिन्नर तालुक्यातील दापूर येथील रहिवासी असलेला डॉक्टर संगमनेर शहरालगत असलेल्या घुलेवाडी परिसरात प्र्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टला करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे या डॉक्टरच्या संपर्कात कोण कोण येऊन गेले त्यांची चौकशी केली जात आहे. या डॉक्टरला तपासणीसाठी नाशिकला पाठविण्यात आले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *