Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्ह्यातील दारू दुकाने आजपासून खुली

जिल्ह्यातील दारू दुकाने आजपासून खुली

जिल्हाधिकार्‍यांनी काढले आदेश दुकानदारांना पाळाव्या लागणार अनेक अटी

अहमदनगर (प्रतिनिधी)– गेला दीड महिन्यांची तळीरामांची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली. हो-नाही म्हणत अखेर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील दारू विक्रीची दुकाने खुली करण्यास हिरवा कंदील दाखविला. मंगळवारपासून (दि. 5) जिल्ह्यातील दारू विक्रीची दुकाने अटी-शर्तीवर सुरू करण्यात येणार असली, तरी हा निर्णय मार्गी लागण्यासाठी आज दिवसभर अनेक घडामोडी घडल्या.

- Advertisement -

करोनाला रोखण्यासाठी देशात तिसरा लॉक़डाऊन सुरू झाला. त्यापूर्वी झालेल्या दोन लॉकडाऊनमध्ये कठोर निर्णय घेत जिवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते. तिसरा लॉकडाऊन सोमवार दि. 4 मे पासून सुरू झाला. यामध्ये नगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्याने बरीच सूट देण्यात आली होती. तसे आदेश रात्री बारा वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले होते.

मात्र मद्यविक्रीबाबत कोणताही आदेश नव्हता. त्यात राज्य उत्पादन शुल्कच्या येथील कार्यालयाने पुढील आदेश येईपर्यंत मद्यविक्रीची दुकाने उघडू नयेत, असा आदेश काढल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. सोमवारी राज्यात काही ठिकाणी मद्यविक्रीस परवानगी दिल्यामुळे आणि त्यातही रेड झोनमध्ये ही परवानगी दिल्याने नगर जिल्ह्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

दुपारी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या येथील अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. त्यावेळी जिल्ह्यात दारू विक्रीची परवाने असलेल्या दुकानांची संख्या, त्यात बाजारपेठ किंवा मॉलमध्ये किती दुकाने आहेत, शहरी भागात आणि ग्रामीण भागात किती आहेत आदी माहिती घेतली होती. वाईन असोसिएशनकडूनही दुसरीकडे प्रयत्न सुरू होते. त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री, राज्याचे आयुक्त, जिल्ह्याचे स्थानिक अधिकारी यांना निवेदने दिली होती. बैठकांचे सत्र संपल्यानंतर अखेर सायंकाळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दारू विक्रीची दुकाने खुली करण्याचा आदेश काढला.

मात्र हे करताना अटी शर्ती टाकण्यात आल्या आहेत. बाजारपेठ, मॉल्समधील दारूविक्रीच्या दुकानांना मनाई कायम आहे. एकल स्वरूपात, गर्दीच्या ठिकाणी नसलेल्या दुकानांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत सीलबंद दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. ही देताना दुकानातील कामगार कोणीही आजारी नसावा, दुकानात सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे, दुकानासमोर गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, दुकानासमोरील भाग दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आदी अटी आहेत.

तसेच दुकानात किंवा दुकानाजवळ कोणीही दारू पिणार नाही, याचीही दक्षता घ्यावयाची आहे. तसे आढळून आल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. दुकानासमोर गर्दी होऊ नये, ग्राहकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे यासाठी गरज असल्यास संबंधित दुकानदार पोलीस बंदोबस्त घेऊ शकतात, असेही या आदेशात सुचविले आहे.

किती दिवस टिकणार?
नाशिकमध्ये सोमवारी दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर एकच गर्दी उसळली. ती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दोन तासानंतर ही दुकाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. हीच परिस्थिती नगरमध्ये उदभवणार नाही, याची शाश्वती नाही. नगर जिल्ह्यात दारू विक्रीचा परवाना असलेली अवघे 32 दुकाने आहेत. त्यातील 19 दुकाने नगर शहरात आहेत. शिवाय प्रशासनाने घातलेल्या अटी पाहता त्यातील अवघे आठ ते दहा दुकानांनाच नगर शहरात परवानगी मिळू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून वाईन असोसिएशनने एक प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर ठेवला होता. त्यात परमीट रूमला पार्सल देण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. दारूविक्री दुकाने आणि परमिट रूम येथील दारूच्या किमतीत फरक आहे. त्यामुळे गर्दी दारूविक्री दुकानांमध्येच होईल हे गृहित धरून दोन्ही किमती समान आणण्याची तयारीही असोसिएशनने दर्शविली होती. यासाठी एकतर परमिट रूममधील दारूला असलेला व्हॅट कमी करावा किंवा तेवढाच व्हॅट दारूविक्री दुकानांनाही लागू करावा. करोनाचे संकट दूर होऊन सुरळीत चालेपर्यंत दारुविक्री दुकानदार आपल्या खिशातून हा व्हॅट जमा करतील, असाही प्रस्ताव होता. मात्र प्रशासनाने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून फक्त दारूविक्रीचीच दुकाने खुली करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे गर्दी उसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या