Wednesday, April 24, 2024
Homeनगरसंगमनेर : धांदरफळ मृत व्यक्तीसोबत आणखी एक पॉझिटिव्ह

संगमनेर : धांदरफळ मृत व्यक्तीसोबत आणखी एक पॉझिटिव्ह

करोना बाधितांची संख्या आता 53
जामखेड येथील एका करोना बाधिताचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह तर एकाला डिस्चार्ज
अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यू पावलेल्या वृध्द व्यक्तीचा अहवाल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री उशीरा या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. ही व्यक्ती 36 वर्षीय असून धांदरफळ येथीलच आहे.
दरम्यान जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता 53 झाली आहे. तर, धांदरफळ येथील करोना बाधित रुग्णांची संख्या आता आठ झाली आहे. त्याच सोबत जामखेड येथील दोघा करोना बाधित तरुणांपैकी एकाचा चौदाव्या दिवसानंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर दुसर्‍या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 35 झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी चार अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यात 7 मे रोजी मृत्यू झालेल्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील व्यक्तीचा समावेश आहे. या व्यक्तीने खाजगी लॅबकडून केलेला अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुन्हा त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठवून त्याची पुष्टी करून घेतली. शुक्रवारी धांदरफळ येथे आढळून आलेले 6 बाधित रुग्ण हे त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील होते. त्यात आणखी एकची भर पडली असून मृत व्यक्तीचा सरकारी प्रयोग शाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने धांदरफळ येथील करोना बाधीतांचा आकडा 8 झाला आहे.
दरम्यान, जामखेड येथील दोघा कोरोना बाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, शनिवारी दोन्हीपैकी एका रुग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता पुन्हा 7 दिवसांनंतर त्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. दरम्यान अहवाल निगेटिव्ह आलेल्या जामखेडच्या 23 वर्षीय करोना बाधित रुग्णाला शनिवारी रात्री बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्याचे 14 व्या दिवसा नंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाल्याने त्याला सोडण्यात आले. नेवासा येथील कोरोना बाधित व्यक्तीचा 14 दिवसा नंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला देखील डिस्चार्ज देण्यात येणार आहे. रात्री उशीरा आणखी 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

1 हजार 603 अहवाल निगेटिव्ह
आतापर्यंत 1 हजार 712 स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 1 हजार 603 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 52 जण पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या जिल्ह्यात 474 जणांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून 443 जणांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या