संगमनेर : धांदरफळचे सात रुग्ण करोनामुक्त
स्थानिक बातम्या

संगमनेर : धांदरफळचे सात रुग्ण करोनामुक्त

Sarvmat Digital

49 रुग्णांची करोनावर यशस्वी मात
अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी जिल्ह्यातील सातजण करोनामुक्त झाले आहेत. हे सर्व संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील असून त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 49 झाली आहे. जिल्ह्यात करोना बाधित व्यक्तींची संख्या 62 असून त्यापैकी केवळ 10 जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
धांदरफळ येथील रुग्णांना करोना बाधित आढळल्यानंतर उपचारासाठी बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गत 10 दिवसांत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना आता आजाराची कोणतीही लक्षणे दिूसून येत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य तपासणी करून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना पुढील 10 दिवस संगमनेर येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनीही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नांना प्रतिसाद दिला आहे. मात्र, अद्यापही करोनाचा धोका संपला नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. घराबाहेर पडताना चेहर्यास मास्क बांधावा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. घरातील वृद्ध, आजारी आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे.
विशेषता शहरी भागात नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशा प्रकारची कृती नागरिकांनी टाळावी. स्वताच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रशासन घेत असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांनाही त्यांनी चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य यंत्रणा आणि बूथ हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, इतर स्टाफ यांनी रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्या या प्रयत्नाबद्दलही द्विवेदी यांनी धन्यवाद दिले.
Deshdoot
www.deshdoot.com