जागतिक तंबाखू विरोधी दिवस : तंबाखू सोडण्यासाठी ‘ क्विट डेट ‘ ठरवावी लागते  !

जागतिक तंबाखू विरोधी दिवस : तंबाखू सोडण्यासाठी ‘ क्विट डेट ‘ ठरवावी लागते  !

नाशिक ( प्रतिनिधी) – एखाद्या व्यक्तीने ठरवले तर तंबाखूचे व्यसन सोडता येते. फक्त त्याच्या काही पद्धती आहेत. त्यांचा अवलंब करावा लागतो. व्यसन सोडण्यासाठी प्रचंड निर्धार लागतो असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ. ऋचा सुळे-खोत यांनी व्यक्त केले. आज जागतिक तंबाखू दिन. त्यानिमित्त त्यांनी साधलेला संवाद. 

प्रश्न – तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ यांचे दुष्परिणाम माहिती असतात. तरीही माणसे ती का खातात? 
उत्तर- तंबाखूमध्ये निकोटीन असते. त्यामुळे मेंदूला चालना मिळते. ते घेतले की माणसाला उत्साही, छान वाटू लागते. त्याची माणसाला सवय होते. त्याची तलफ यायला लागते. त्यामुळे नंतर नंतर एकदाच खाऊन माणसाचे समाधान होत नाही. त्याला ती सारखी खावीशी वाटू लागते. 
दुसरे कारण म्हणजे तलफ आल्यावर तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ घेतले नाही तर त्याची सवय झालेल्या माणसांना अस्वस्थ वाटू लागते. अनेकांचे डोके दुखायला लागते. काहींना बारीकसा तापही जाणवायला लागतो. असे अनेक शारीरिक दुष्परिणाम होतात. ते टाळण्यासाठी माणसे परत परत व्यसन करतात. 
प्रश्न – एखाद्याला तंबाखू सोडायची असेल तर तो स्वतःची कशी मदत करू शकतो?
उत्तर- व्यसन सोडायचे असेल तर माणूस स्वतःची मदत नक्कीच करू शकतो. व्यसन सोडण्याच्या काही पद्धती आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यासाठी प्रचंड निर्धाराची आवश्यकता असते. तसा तो असेल तरच व्यसन स्वतःहुन सोडता येते. 
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसन सोडण्याचा प्लॅन ठरवावा लागतो. त्याची एक ‘ क्विट डेट ‘ ठरवावी लागते. म्हणजे अमुक एका दिवशी मी व्यसन पूर्णपणे सोडेल असा दिवस ठरवावा लागतो आणि त्यानुसार आधीपासून काही गोष्टी अंमलात आणाव्या लागतात. 
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही माणसे ‘ तुझी शपथ, आजपासून मी तंबाखू खाणार नाही ‘ असे म्हणून तंबाखू खाणे एकदम बंद करतात. पण तसे कधीच करू नये. कारण विशेषतः तंबाखू खाणे एकदम बंद केले की त्याची जोरदार तलफ येऊन माणसे पुन्हा एकदा तंबाखूकडे वळण्याची शक्यता जोरदार असते. त्यामुळे तंबाखू हळूहळू सोडावी. म्हणजे रोज तीन वेळा खात असाल तर सुरुवातीला दोन वेळा..नंतर एक वेळा…. असे करावे आणि एक दिवस पुडी फेकून द्यावी. 
चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसन सोडले तर शारीरिक दुष्परिणाम जाणवू शकतात. जर असा काही त्रास झाला तर त्यावर वैद्यकीय उपचार जरूर करावेत. 
या काळात आहार-विहार, व्यायाम अशी दिनचर्या पाळावी. तलफ जावी म्हणून काही जण बाजारात मिळणाऱ्या निकोटिनच्या गोळ्या घेतात किंवा चुईंगम खातात. असे करताना ते कधी, किती आणि कसे खावे हे जरूर समजावून घ्यावे. अनेक जण ते चुकीच्या पद्धतीने खातात. तसे करू नये. ते नार्मली मिळणाऱ्या चुईंगमसारखे नसते. काही माणसे ते एकदाच चावून चावून खातात आणि फेकून देतात. काही माणसे ते तंबाखूबरोबर खातात. ते चुकीचे आहे. खरे तर तलफ आल्यावर ते चुईंगम तोंडात टाकायचे.

तलफ फारवेळ राहत नाही. त्यामुळे ते थोडेसे लावायचे आणि गालाच्या बाजूला ठेवून द्यायचे. अशा चुका टाळण्यासाठी त्याबरोबर एक पॅम्प्लेट दिलेले असते. ते पूर्णपणे वाचावे. त्यात सगळ्या सूचना दिलेल्या असतात. त्या पाळाव्यात. अन्यथा त्याचा काही उपयोग होत नाही असा त्यांचा गैरसमज होतो. आणि माणसे कदाचित पुन्हा एकदा तलफ भागवण्यासाठी व्यसनाकडे वळू शकतात.

तेव्हा व्यसन सोडण्याचा निर्धार करा आणि तो अंमलात आणा. 

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com