Friday, April 26, 2024
Homeनगरप्रेयसीवर धारदार शस्त्राने वार

प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार

राहुरी विद्यापीठाजवळील घटना : हरेगावच्या तरुणास अटक

राहुरी (प्रतिनिधी)- ‘प्रेमसंबंध ठेव’ म्हणत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील असिफ कबीर पठाण या तरुणाने राहुरी विद्यापीठाच्या उजव्या कालव्याजवळ विवाहित महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली. एखाद्या फिल्मी ‘लवस्टोरी’लाही लाजविणारी ही घटना रविवारी सायंकाळी घडली. दोघेही श्रीरामपूर तालुक्यातील असून ‘नाजूक’ प्रकरणातून ही घटना घडली असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

दरम्यान, त्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर त्या महिलेला तशा अवस्थेत सोडून तो तरुण घटनास्थळाहून पसार झाला. नंतर त्या महिलेने नगर-मनमाड महामार्गावर येऊन प्रवाशांना मदतीची याचना केली. या घटनेची खबर राहुरी पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्या महिलेला नगर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तो हल्लेखोर तरुण राहुरी पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली असून राहुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी त्या महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पठाण याच्यावर भादंवि क.307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पठाण यानेच उंदीरगाव हद्दीतील महिलेला काळ्या-पिवळ्या चारचाकी वाहनातून राहुरी विद्यापीठाजवळील उजव्या कालव्याजवळ आणले. त्यांच्यात तेथे कडाक्याचे वाद झाले. तू मला सोडून दुसर्‍याबरोबर प्रेमसंबंध ठेवते, असे म्हणून त्याच्याजवळ असलेल्या धारदार सुर्‍याने तिच्या शरीरावर वेगवेगळ्या भागावर वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या घटनेचा पुढील तपास सपोनि राक्षे हे करीत आहेत.

अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा- ढोकणे राहुरी येथील राहुरी विद्यापीठानजिक उजव्या कालव्याजवळ उंदीरगाव येथील महिलेचे अपहरण करून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणार्‍या आरोपीवर अ‍ॅट्रासिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रीरामपूरचे नगरसेवक प्रकाश अण्णासाहेब ढोकणे यांनी केली आहे. अन्यथा श्रीरामपूर येथे रास्ता रोको करण्याचा इशारा ढोकणे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

दरम्यान, आज बुधवार दि. 5 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दलित-मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले असून या घटनेवर पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती ढोकणे यांनी दिली आहे. राहुरी येथील पोलीस प्रशासनाने आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, संबंधित अधिकार्‍यांनी दलित समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप ढोकणे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या