Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरनगर, नेवासा, कोपरगाव, पारनेरातील व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेरातील व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

आणखी दोघा बाधितांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सोमवारी पाठविलेले 19 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून अद्याप 54 अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, कोरोना बाधीत आणखी दोघा रुग्णांचे 14 दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज मिळणार आहे.
दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या आणखी दोघांमध्ये आलमगीर (ता.नगर) येथील एक आणि सर्जेपूरा (नगर) येथील एका रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. या दोन्ही बाधितांना आता संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मंगळवारी कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेल्या व्यक्ती या जामखेड, नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 409 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1 हजार 310 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. अजून 54 अहवालाची प्रतीक्षा आहे. तर काही अहवाल प्रयोगशाळेने फेटाळून लावले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज आणखी दोघे कोरोनावर मात करणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील 31 पैकी 20 रुग्ण कोरोनावर मात केली आहे.
1 हजार 28 व्यक्ती क्वारंटाईन
कोरोना संशयीत आणि निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने संस्थात्मक अथवा त्यांच्या घरात क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. यात 581 व्यक्ती हे संस्थात्मक तर 447 व्यक्ती हे होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
55 हजारांचा दंड वसूल
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनामध्ये सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणार्‍या 176 आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या 41 व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांकडून 54 हजार 700 रुपयांच्या दंडाची वसुलीची कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
- Advertisment -

ताज्या बातम्या