Thursday, April 25, 2024
Homeनगरअकोले तालुका संपूर्ण लॉकडाऊन

अकोले तालुका संपूर्ण लॉकडाऊन

अकोले (प्रतिनिधी)-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला अकोलेकरांनी उत्स्फूर्तपणे साथ दिल्याचे चित्र काल दिवसभर दिसले. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण अकोले शहर व तालुक्यातील प्रमुख गावांत शुकशुकाट जाणवत होता. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत होते. वृत्तपत्र व दुग्ध व्यावसायिकांनी 7 वाजेच्या आत आपली कामे आटोपून जनता कर्फ्यूची कडक अंमल बजावणी केली. अकोले शहरासह तालुक्यात सर्वत्र अशा प्रकारे आशादायक चित्र निर्माण झाले होते. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व सामाजिक संघटना यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम राबविले गेले व नागरिकांची जनजागृती केली. त्यास सर्वच अबाल वृद्धांची साथ दिली असल्याचे कालच्या बंदमधून दिसले.

अकोले नगर पंचायतने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात रस्त्याच्या दुतर्फा औषध फवारणीचे काम केले. सोशल मीडियावर नगरपंचायत पदाधिकारी, मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक होताना दिसत होते.
जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्याऐवजी रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या वाहनांची तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक दीपक ढोमने व त्यांच्या सहकार्‍यांकडून कसून तपासणी सुरू होती. विनाकारण वाहने रस्त्यावर फिरविणार्‍या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस व महसूल प्रशासनाने दिल्यानंतर रस्त्यावर उगाचच वाहने फिरविणार्‍यांनी कारवाईचा धसका घेतला. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणारी वाहने दिसली नाही. नागरिकांनी टाळ्या वाजवून समाजासाठी काम करणार्‍या सफाई कामगार, डॉक्टर, मेडिकल व्यावसायिक, आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन व अत्यावश्यक सेवा देणार्‍यांचे कौतुक केले.

- Advertisement -

राजूर येथे रस्त्यावर शुकशुकाट

राजूर (वार्ताहर)– कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अकोले तालुक्यातील राजूरमधील नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देत जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन केले.
शहरातून जाणार्‍या सर्व रस्त्यांवरून नेहमी 24 तास वाहतुकीची वर्दळ असते पण जनता कर्फ्यूमुळे काल रोड निर्मनुष्य झाले होते. राजूर शहरासह ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांनी जनता कर्फ्यूस 100 % लोकांनी प्रतिसाद दिला, असे सहा. पो.नि नितीन पाटील यांनी सांगितले. तसेच शहरात आमचे पोलीस कर्मचारी हे मोटर सायकलवर फिरून लोकांना घरी थांबण्यास सांगत होते. याआधी कधीही शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते असे निर्मनुष्य झाले नव्हते किंवा कर्फ्यू लागला नव्हता असे येथील जाणकार नागरिकांनी सांगितले. पंतप्रधानांच्या या आवाहनाचे पालन करून सर्वांनी या आव्हानाला साथ देऊन जनता कर्फ्यू यशस्वी केला. कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय असून कर्फ्यूसह 31 मार्चपर्यंत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे तरच त्याचा फायदा होईल.

आढळेत स्वयंस्फूर्त निरव शांतता

वीरगाव (वार्ताहर) – कोरोना रोगाच्या प्रतिबंधात्मक दक्षतेसाठी आणि जनजागृतीकरिता शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोले तालुक्यातील आढळा परिसरात जनतेने कडकडीत संचारबंदी पाळली.
सकाळी 7 वाजेपासून वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव, सावरगाव पाट या गावांमध्ये नागरिकांनी संचारबंदी सुरू केली. शेतीचे, दुग्धोत्पादनाचे सारे कामकाज या गावांमध्ये भल्या पहाटे सुरू होऊन ते बरोबर सात वाजता संपले. त्यानंतर सर्वांनीच स्वत:ला घरात कोंडून घेतले. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाळली गेलेली ही जनता संचारबंदी स्वयंशिस्तीचा परिपाठच ठरली.वरील गावांमध्ये सर्वांनीच काटेकोरपणे आपले सारे दैनंदिन जीवन घरातच व्यतित केले.परिसरातील सारे रस्ते यावेळी निर्जन आणि निरव शांततेचे दिसून आले. सध्या दूरचित्रवाणी किंवा भ्रमणध्वनीवर केवळ कोरोनाष्टकच आहे. त्यामुळे अनेकांनी घरातच गप्पाष्टकांचा फड रंगविला. काहींनी वाचनाला पसंती दिली. कधी नव्हे इतक्या एकत्रितपणे कुटुंबातील सारी माणसे अनेक तास एकमेकांबरोबर असल्याने कोरोनाच्या भयातही सर्वांनाच सुखद मानसिकतेचा अनुभव आला. कोरोनाच्या विषाणूंबरोबरचे युध्द आपण सकारात्मक मानसिकतेने आणि एकजुटीच्या प्रबळ आत्मविश्वासाने लढू शकतो याची खात्री आली कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सार्‍या आढळा परिसराने निरोगी देशकार्यासाठी शासन आदेशाचे काटेकोर पालन करून जनता संचारबंदीत भाग घेतला.

मोदींच्या जनता कर्फ्यूला समशेरपूरकरांचा प्रतिसाद

समशेरपुर (वार्ताहर)ः- अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच समशेरपूर आणि परिसरात रस्त्यावर शुकशुकाट होता. एकही दुकान तसेच चहाची टपरी सुरू नव्हती आणि वाहने सुध्दा हाताच्या बोटावर मोजण्या इतपत दिसत होती. अकोले तालुक्यातील समशेरपूर हे आढळा परीसरातील मोठे व्यापारी पेठेचे गाव. परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार या गावातूनच सुरू असतात. यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने लोकांची वर्दळ असते. सध्या जगात कोरोना विषाणूची साथ सुरू असून हा आजार संसर्गजन्य आजार आहे. या आजाराने आजपर्यंत संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळणे व संसर्ग टाळणे याकरिता पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारतभर लॉकडाऊन करण्याचे आवाहन देशातील जनतेला केले होते. याचाच एक भाग म्हणून समशेरपूर आणि परिसरातील जनतेने सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत बंदला समर्थन दिले. यावेळी कायम गजबजलेला समशेरपूर व्यापारी पेठेचा परिसर संपूर्ण बंद होता. समशेरपूर एसटी स्टँडच्या परिसरात शुकशुकाट होता. विशेष म्हणजे समशेरपूर फाटा येथे रोज शेकडो लोकांची वर्दळ असते. परंतु आज फाटा निर्मनुष्य होता. त्यामुळे समशेरपूर आणि परिसरात जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी झाला.

कळसचा जनता कर्फ्यूसाठी शंभर टक्के पाठिंबा

कळस (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोना रोखण्यासाठी आयोजित जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. कळस परिसरात सकाळीच दूध संकलन करण्यात आले. कळसेश्वराचे मंदिर बंद करण्यात आले. गावातील सर्व छोटे -मोठे दुकानदार यांनी गेल्या दोन दिवसांपासून स्वयंस्फुर्तीने बंद ठेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती केली. ग्रामपंचायत व कळस ग्रामस्थांकडून दवंडी , फलक व माईकद्वारे जनजागृती करण्यात आली. सोशल मीडियाच्या आधारे जीआर सोशल नेटवर्किंग व जीआर फाउंडेशन या ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. सायंकाळी नागरिकांनी घराच्या दारातून, खिडकीतून, गॅलरीतून टाळ्या वाजवून, घंटानाद करून कोरोना रोखण्यासाठी युध्द पातळीवर काम करणार्‍या डॉक्टर, जवान, पोलीस, अधिकारी, प्रशासन यांचे अभिनंदन केले आहे.

कोतूळ बंद यशस्वी

कोतूळ (वार्ताहर)ः- कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोले तालुक्यातील कोतूळ येथे काल कडकडीत बंद पाळला गेला. गावातील सर्वांनी आपापले व्यवहार बंद केले. सर्व व्यवसायिकांनी दुकाने दिवसभर बंद ठेवली. कोतूळ ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना व व्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. याप्रमाणे सर्वांनी कोरोनाला रोखण्यासासाठी स्वतःहून दुकाने बंद केली. भारतातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने उचललेल्या या पावलांना कोतूळकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.

गणोरे परिसरात कडकडीत बंद

गणोरे (वार्ताहर) – काल सकाळ पासून अकोले तालुक्यातील गणोरे ग्रामस्थांनी केंद्र व राज्य सरकारचे आवाहनानुसार गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गावातील सर्व प्रकारची दुकाने, रस्त्यावरील लागणार्‍या विविध विक्री करणारे टपर्‍या, शासकीय कार्यालय चहाची हॉटेल्स पूर्णतः कडकडीत बंद ठेवण्यात आलेली आहेत. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिला आहे.
धामणगाव आवारीत शंभर टक्के बंद

धामणगाव आवारी (वार्ताहर)- कोरोना विषाणूच्या जीवघेण्या संकटावर मात करण्यासाठी अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी व परिसरात कडकडीत बंद पाळून जनता संचारबंदीस ग्रामस्थांनी 100 टक्के प्रतीसाद दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या