Saturday, April 27, 2024
Homeनगरजामखेडमधील आणखी तिघांना करोना; जिल्ह्याचा आकडा 43 वर

जामखेडमधील आणखी तिघांना करोना; जिल्ह्याचा आकडा 43 वर

एकूण संख्या 17

अहमदनगर (प्रतिनिधी)- जामखेड येथील करोना रुग्णांच्या संख्येत रविवारी आणखी तीन व्यक्तीची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शनिवारी पाठविलेल्या अहवालापैकी या तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या 43 झाली आहे. जामखेड शहरात करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तींच्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची चेनच आता करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात करोना बाधीत व्यक्तींचा आकड्याने आता अर्ध शतकाच्या दिशेेने वाटचाल करण्यास सुरूवात केल्याने आरोग्य विभागासह, जिल्हा प्रशासन टेन्शनमध्ये आले असून नागरिकांनी आतातरी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शनिवारी सकाळी 41 व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 38 व्यक्तींचे अहवाल शनिवारी रात्री उशीरा प्राप्त झाले होते. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. तर उर्वरित तीन अहवालांची प्रतीक्षा होती. ते अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले. त्यात, जमखेडमधील या तीन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये 45 आणि 50 वर्षीय पुरुष तर 35 वर्षीय महिला असे तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

काही दिवसांपूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले करोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. रविवारी पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधीत आढळून आल्या.

यामुळे एका बाधितामुळे जामखेड शहरात सुरू असणारी करोनाची चेन कशी बे्रक करावी, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे. आता जिल्ह्यातील करोना बाधीत व्यक्तींची संख्या 43 झाली आहे. त्यापैकी 24 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये 14 रुग्ण असून या तिघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आतापर्यंत 1 हजार 495 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1 हजार 419 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 15 अहवालांची प्रतीक्षा आहे. सध्या 690 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून 122 जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात 102, एआयएमएस हॉस्पिटलमध्ये दोन व्यक्ती उपचार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या