तिसरा बाधित रूग्ण देखील परदेशातून आलेल्यांच्या संपर्कात !
स्थानिक बातम्या

तिसरा बाधित रूग्ण देखील परदेशातून आलेल्यांच्या संपर्कात !

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना बाधित तिसर्‍या रूग्णाच्या हिस्ट्रीबाबत निश्चित काही कळत नसल्याने चिंता वाढली होती. मात्र ही व्यक्ती देखील परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तींचेही नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या नगरमधील ही व्यक्ती कोरोना बाधित असलेली तिसरी व्यक्ती आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि हाय रिस्क असलेल्या 23 व्यक्तींचे स्त्रावचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ही व्यक्ती कोणत्याही परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात नसल्याचे सुरूवातीला सांगण्यात आले होते. त्यामुळेच प्रशासनाची चिंता वाढली होती.

कोरोना झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न आलेल्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सर्वच चिंतेत होते. संबंधित बाधित व्यक्तीस कोणाकोणाशी संपर्क आला, याबाबत विचारणा करण्यात येत होती. त्यांना जे जे आठवेल ते त्यांच्याकडून सांगण्यात आले.

मात्र, ते रहात असलेल्या परिसरातच एक परदेशातून आलेली व्यक्ती असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत स्पष्ट झाले. त्या व्यक्तीशी संपर्क आल्याचेही संबंधित रूग्णाने मान्य केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर संबंधित परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या व्यक्तींचे अहवाल कसे येतात, याकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com