नेवाशात आणखी एक कोरोना रूग्ण
स्थानिक बातम्या

नेवाशात आणखी एक कोरोना रूग्ण

Sarvmat Digital

संपर्कात आलेल्या श्रीरामपुरातील दोन डॉक्टरांसह 9 जणांना नगरला हलविले

नेवासा (तालुका वार्ताहर)- नेवासा शहरात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दि.19 एप्रिल पर्यंत 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

दरम्यान,कोरोना बाधित नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णाचा कुठे संपर्क आला याची माहिती घेतल्यानंतर सर्व संपर्क आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. एकूण वीस व्यक्तींशी जवळचा संपर्क आला आहे. श्रीरामपूर येथील नऊ जणांशी संपर्क आला असून यामध्ये दोघे डॉक्टर आहेत. या नऊ जणांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर उर्वरित नेवासे येथील व्यक्तींना दुपारी चार वाजेच्या सुमारास नगरला हलविण्यात आले.

सदरचा रुग्ण हा नेवासा नगरपंचायत हद्दीतील रहिवाशी असून त्याच्यापासून सदर आजाराचा इतर व्यक्तींना प्रादूर्भाव प्रसार होऊ नये यासाठी नवीन कोर्ट परिसरापासून नेवासा शहर परिसर व आजुबाजुच्या वस्त्यामधील सर्व अत्यावश्यक सेवा दूध, भाजीपाला, औषधाचे दुकाने, दवाखाने व नागरी तथा सहकारी बँका यासह इतर सर्व अस्थापना दि.13 रोजी दुपारी 12 वाजेपासून दि.19 एप्रिल सकाळी 06.00 वाजेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.

करोना बाधीत व्यक्ती 50 वर्षे वयाची असून त्यास दमा तसेच डायबेटिक त्रास होत होत असल्याने दि. 5 एप्रिलपासून खासगी दवाखाना सुरू होता. रुग्णास श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना नेवासे शहरातील खासगी रुग्णालयात तपासण्यासाठी नेण्यात आले होते. दोन दिवसानंतरही काही फरक न पडल्याने त्यांचा एक्सरे काढण्यात आला त्यानंतर श्रीरामपूर येथील एका खासगी रुग्णालयात तपासण्यासाठी नेण्यात आले. त्यांनीही नगर येथील शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र पुन्हा श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयातून श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासण्यात आल्यानंतर पुन्हा नगर येथे दाखविण्याचा सल्ला दिला.

नगर येथे त्या रुग्णास हलविण्यात आल्यानंतर 11 एप्रिल रोजी त्याला पुण्याला हलविण्यात आले. दि. 13 एप्रिल रोजी सकाळी नेवासा येथील पन्नास वर्षीय व्यक्तीस करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. सकाळी दहा वाजल्यापासून नेवासा प्रशासनाने नेवासा शहर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेवासा शहरातील सर्व बँका, किराणा दुकाने, मेडिकल दुकाने दूध विकृती तसेच भाजीपाला विकणारे यांनाही दुकाने बंद करण्यास सांगितले.

जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने राहणार बंद
लॉक डाऊनमध्ये नेवासा शहर पूर्ण तसेच नेवासा फाटा रस्त्यावरील नेवासा न्यायालयापर्यंत पूर्ण नाका बंदी असणार आहे. रस्त्यावर कुणीही फिरू नये. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी वाहने ही जप्त करण्यात येतील. किराणा, मेडिकल, दूध, भाजीपाला या सर्व वस्तू नेमून दिलेल्या दुकानदारांना मोबाईलवर फोन केल्यानंतर घरपोहोच मिळतील. दरम्यान स्वच्छता सेवा, पाणीपुरवठा सेवा, अग्निशमन सेवा, विद्युत वितरण, सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापना यांना लॉकडाउनमधून वगळण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com