‘करोना’मुळे नाशकातील पर्यटनाला उतरती कळा; रोजगारावर परिणाम

‘करोना’मुळे नाशकातील पर्यटनाला उतरती कळा; रोजगारावर परिणाम

नाशिक । चीनमध्ये पसरलेल्या करोना व्हायरसच्या संसर्ग हा भारतातही झपाट्याने होत असून त्याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर देखील होत आहे. 15 एप्रिलपर्यंत इतर देशातील पर्यटकांना देशात बंदी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक पर्यटन स्वत:हून टाळत आहे. नाशिकमध्येही करोना व्हायरसमुळे पर्यटकांचा ओघ घटल्याचे पहायला मिळते. त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायाशी निगडीत रोजगारावर झाला असून शहराचे अर्थकारण मंदावले आहे.

देशात दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेश, पुणे, मुंबईमध्ये देखील करोना संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 84 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. सर्तकता म्हणून परदेशातून येणार्‍या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे. खासगी व सार्वजनिक सोहळे रद्द करावे, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम देशाअंतर्गत पर्यटनावर देखील झाला आहे.

परिणामी नाशिक जिल्ह्यातील येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. धार्मिक स्थळे, सुला वाईनरी, कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक नाशकात येतात. त्यात गुजरात, मध्यप्रदेश तसेच, उत्तरेकडून येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते. परदेशातूनही नाशकात पर्यटक येतात. मात्र, करोनामुळे अनेकांची नाशिकसाठी केलेले बुकींग रद्द केले आहे. तर, काहीनी नाशिक भेट पुढे ढकलली आहे. मागील एक आठवडयात नाशिकला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या रोडावल्याचे पहायला मिळते. त्याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. रिक्षा, टॅक्सी सेवा, हॉटेल, लॉज आदींचे धंदे थंडावले आहे.

रामकुंड, गोदाघाटावरील मंदिरे, सोमेश्वर, नवश्या गणपती, तपोवन, त्र्यंबकेश्वर, पांडवलेणी, फाळकेस्मारक, चामार लेणी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक भेट देत असतात. मात्र, करोना व्हायरसमुळे ही स्थळे सुनीसुनी झाली आहेत. लोक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहे. तसेच, रामकुंडावर धार्मिक विधीसाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक येत असतात. मात्र, नेहमीच्या तुलनेत भाविकांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम पौरोहित्यावर झाल्याचे पहायला मिळते.

करोना व्हायरसचा मोठा फटका पर्यटनाला बसला आहे. मार्च ते मे हा टूर कंपन्यांसाठी व्यवसायाची संधी असते. मात्र, करोनाच्या दहशतीमुळे पर्यटकांच्या संख्येत 70 टक्के घट झाली आहे. नागरिकांनी त्यांच्या बुकींग रद्द केल्या आहेत. तर, काहींनी पुढे ढकलल्या आहेत. नाशिकमध्येही पर्यटकांचा ओघ घटला आहे. साहजिकच पर्यटनाशी निगडीत सर्व क्षेत्रांना त्याचा तोटा सहन करावा लागत आहे.
– दत्ता भालेराव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com