नगरमधील बड्या नेत्याकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा

नगरमधील बड्या नेत्याकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा

गुन्हा दाखल मात्र माहिती लपविण्यासाठी आटापीटा

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व मंत्री दिवसरात्र मेहनत घेत आहेत. परंतु, राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षाच्या नगर शहरातील एका बड्या नेत्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडविला. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात या नेत्यावर आणि त्यांच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलिसाने दिली असली, तरी रात्री उशीरापर्यंत त्याची माहिती लपविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न पोलिसांकडून झाले. गुन्हा दाखल करून देखील या विषयी गोपनीयता बाळगली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही याबाबत मिठाची गुळणी घेतली होती.

लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. करोना धोका टाळण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे आहे. मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी करोना रोखण्यासाठी झटत आहे. परंतु, सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या शहरातील या नेत्याने नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले. या नेत्याचा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला.

वाढदिवसाला खुशमस्करी करणार्‍या कार्यकर्त्यांनी वारेमाप गर्दी केली होती. नेत्याचाच वाढदिवस त्यात सत्ता असल्याने भिती कोणाची़? त्यामुळे सारे हावशे गवशे गर्दीने जमा झाले. अनेकांनी त्यावेळी मास्कचा वापर केलेला नव्हता. सोशल डिस्टन्सचा तर पुरता फज्जा उडविला होता. कार्यकर्त्यांसह गर्दी केल्याने, मास्क न वापरल्याने पोलिसांनी नेत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर मात्र कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी गोपनीयता बाळगली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, असे म्हणत कानावर हात ठेवले. शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी गुन्हा दाखल झालेल्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. परंतु, अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी तर फोन घेत नव्हते. शहरात मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती तात्काळ सर्वत्र पसरली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com