चायनामेड पतंग घेणार नाशिकच्या आसमंतात भरारी
स्थानिक बातम्या

चायनामेड पतंग घेणार नाशिकच्या आसमंतात भरारी

Gokul Pawar

नाशिक । मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येेऊन ठेपला असतानाच ढिल दे रे… म्हणत आसमंतात सैर करणार्‍या पतंगांनीदेखील लक्ष वेधायला सुरुवात केली आहे. पतंग आणि संक्रांत हे समीकरणच झाले असून अबालवृद्धांसह सारेच या काळात आपली पतंग उडवण्याची हौस भागवून घेतात. यापुढचे दोन आठवडे सर्वच भागातील आकाश सप्तरंगांनी व्यापून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बाजारपेठेत पारंपरिक पतंगांसोबतच मेड इन चायना असणार्‍या नानाविध रंगांच्या आणि ढंगांच्या पतंगांची रेलचेल बघायला मिळत आहे.

बच्चे कंपनीसोबतच संक्रांतीला घरातील सारेच पतंग उडवतात. कागदाच्या विविधरंगी, शेपटीच्या, बिनशेपटीच्या या पतंगांचा कापाकापीचा थरार प्रत्येकजण अनुभवतो. संक्रांतीच्या दिवशी घरांच्या गच्चीवर, मोकळ्या मैदानावर आणि उंच टेकडीवर जाऊन पतंग उडवल्या जातात. यंदाच्या संक्रांतीलादेखील अशीच तयारी घराघरांत सुरू असून पारंपरिक आकाराच्या पतंगांसोबतच नव्या रंगरूपातील पतंग विक्रीला आले असून पाच रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत किमती असणारे हे पतंग नाशिकच्या आसमंतात भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. चायनामेड असणारे रेनबो, जोकर, डॉग, टायगर, ईगल, पिकॉक, पेंग्विन, शार्कच्या आकारातील पतंग ग्राहकांचे लक्ष वेधत असून प्राणी आणि पक्ष्यांचे आकार असणारी सुमारे डझनभर प्रकारातील मालिका विक्रीसाठी तयार ठेवण्यात आली आहे.

रेनबो 30 रुपये, जोकर 220 रुपये, डॉग 1000 रुपये , टायगर 150 रुपये, ईगल 300 रुपये, पिकॉक 350 रुपये, पेंग्विन व शार्कच्या आकारातील पतंग 500 रुपयांना विकली जात आहे. स्माईली प्रकारातील पतंग 100 रुपयांना असून पाच रुपयांपासून कागदी पतंग विक्रीसाठी आहेत.

प्लॅस्टिकऐवजी पॅराशूटचे कापड
चायनामेड पतंग हाताळण्यास सुलभ आहेत. त्या बनवण्यासाठी अगोदर प्लॅस्टिकचा वापर केला जायचा. मात्र आपल्याकडे प्लॅस्टिकवर बंदी असल्याने यावेळी पॅराशूटसाठी वापरण्यात येणार्‍या कापडापासून बनवलेल्या पतंग विक्रीसाठी मागवण्यात आल्या आहेत. या कापडापासून बनवलेल्या पतंग वजनाला हलक्या असून त्या फाटत नाही. पाण्यात भिजली तरी वाळवून ती पुन्हा वापरता येते. गरम इस्त्री फिरवली तरी चालते आणि सध्या दोर्‍याच्या मदतीने ती सहजपणे उडवता येते. 30 रुपयांपासून हे पतंग उपलब्ध आहेत. साधारणपणे सव्वा फूट बाय एक फूट या आकारापासून 15 फूट बाय 25 फूट या आकारातील पतंग चायनामेड श्रेणीत उपलब्ध असल्याची माहिती वितरक प्रताप चव्हाण यांनी दिली.

हॅण्डमेड टूकल गाईड
अमृतसरमध्ये निर्मित होणारी टूकल गाईड ही पतंग हॅण्डमेड श्रेणीतील आहे. दिवसाकाठी या केवळ 20 ते 25 पतंग बनवल्या जातात. दोन फूट बाय दोन फूट आकारातील या कागदी पतंगांनादेखील मागणी असून तिची किंमत 80 रुपये आहे. याशिवाय स्माईलीच्या विविध आकारातील चायनामेड पतंगदेखील ग्राहकांची पसंती ठरली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com