पत्नीचा गळा आवळून खून; संशयित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
स्थानिक बातम्या

पत्नीचा गळा आवळून खून; संशयित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

पंचवटी | वार्ताहर

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठरोडवर असलेल्या इंद्रप्रस्थनगरी येथे पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना काल बुधवारी (दि.२६) रात्री उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर संशयित आरोपी पतीने स्वतःच्या हातावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चैताली सुनिल बावा (२३) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचा नाव आहे. काल मयत चैताली व पती सुनिल या दोघांत काहीतरी कारणावरून वाद झाले होते. त्यातूनच पती सुनिल याने चैतालीचा गळा आवळून खून केला.

दोन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता त्यांना अडीच महिन्यांची मुलगी असून संशयित आरोपी पती सुनिल बावा (३०) हा सैन्यदलात नोकरीला असून त्याची नेमणूक श्रीनगरला आहे. विशेष म्हणजे तो दहा दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता. पत्नीचा खून केल्यानंतर संशयित आरोपीने त्याचा कल्याण येथे राहणारा चुलत भाऊ किशोर भारती याला फोन केला. त्यावेळी भारती याने वहिनी कुठे आहे विचारले असता आरोपी बावा याने ती स्वर्गात गेली असे सांगितले.

त्यावेळी चुलत भाऊ असलेल्या भारती याला संशय आल्याने व त्याने लागलीच त्या मुलीचे सिडको येथे राहणारे वडील प्रकाश बावा यांना माहिती कळविली व काही वेळाने ते पेठरोडला इंद्रप्रस्थनगरी येथे दाखल झाले.

त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला असता सुनिल याने दरवाजा उघडला नाही. मग त्यांनी जोरजोरात आवाज दिल्यानंतर त्याने दरवाजा उघडला त्यावेळी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती कळविली आणि काही वेळाने म्हसरूळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित बावा यास ताब्यात घेतले. घरात चैताली जमिनीवर पडलेली होती तर सुनिल याने हातावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने घरात जमिनीवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. दरम्यान संशयित सुनील याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलीस करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com