जेलरोडला सहा जुगारी जेरबंद; अवैध धंदे विशेष पथकाची धाड
स्थानिक बातम्या

जेलरोडला सहा जुगारी जेरबंद; अवैध धंदे विशेष पथकाची धाड

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी

मोकळ्या जागेत जुगार खेळणार्‍या व खेळवणार्‍या 6 जुगार्‍यांना मंगळवारी (दि. २४) दुपारी अवैध धंदे विरोधी विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. जेलरोड शिवारातील पाण्याच्या टाकी जवळील मच्छी मार्केटजवळ ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी जागा मालक विलास पवार (रा. जेलरोड) याच्यासह इतर पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड परिसरात मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती अवैध धंदे कारवाई पथकास मिळाली.

त्यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांनी मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. त्यात संशयित सुरेश देवराम कुवर (61, जेलरोड), देविदास राधाकिसन पगारे (34, दोघे रा. जेलरोड) हे जुगार्‍यांकडून मटका खेळवून घेत असल्याचे आढळले.

यात पोलिसांनी इतर तीन जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून 1 लाख 12 हजार 624 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगार्‍यांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com