स्थानिक बातम्या

लाचखोर जाधवची कारागृहात रवानगी; नागदरे, देवरे यांच्या कोठडीत वाढ

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

लाचखोरीप्रकरणी अटक करण्यात आलेले सातपूरचे पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर तालुक्याच्या दोघा निरीक्षकांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब रामकिसन नागदरे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे यांच्या कोठडीत कोर्टाने एका दिवसाची वाढ केली. या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्यासाठी 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 50 हजार रुपये स्वीकारताना सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना शुक्रवारी सातपूर पोलीस ठाण्याच्या आवारातील शासकीय निवासस्थान येथे सापळा रचून पकडले होते.

न्यायालयाने त्यांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. एसीबीने लागलीच जाधव यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली. त्यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे.

तालुका पोलीस ठाण्याचे नागदरे आणि देवरे यांना गुरुवारी लाचेची रक्कम घेताना तालुका पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी एका इव्हेंट मॅनेजमेंटचे काम पाहणार्‍या व्यक्तीने तक्रार दिली आहे. कार्यक्रमा दरम्यान साऊंड सिस्टिमचा वापर करण्याची मंजुरी देण्यासाठी नागदरे आणि जाधव यांनी पैशांची मागणी केली होती. त्यातील 25 हजारांची रक्कम घेताना दोघांना एसीबीने पकडले. यानंतर कोर्टाने दोघांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. एसीबीने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने दोघांच्या कोठडीत एका दिवसाची वाढ केली.

पोलीस ठाण्यांना निरीक्षकांची प्रतीक्षा

सातपूर तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना लाच प्रकरणी अटक केल्यानंतर दोन्ही पोलीस ठाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा पदभार सध्या सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील रजेवर असून ते हजर झाल्यानंतर सातपूरचा निर्णय होणार आहे. तर तालुका पोलीस ठाण्याचा निर्णय येत्या दोन-चार दिवसात होईल, अशी माहिती ग्रामीण पोलीस दलाच्या सूत्रांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com