Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : ‘एकेरी पट’ ने मारला महाराष्ट्र केसरी किताब; हर्षवर्धनने देशदूत संवाद...

Video : ‘एकेरी पट’ ने मारला महाराष्ट्र केसरी किताब; हर्षवर्धनने देशदूत संवाद कट्ट्यात सांगितले गुपित

नाशिक :

नाशिकचा सुपुत्र असलेल्या हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेला आस्मान दाखवत मानाचा ’महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. गेल्या अनेक वर्षांपासूनचे त्याचे तसेच त्याच्या बलकवडे वस्तादांचे स्वप्न साकार झाले आहे. यासाठी त्याने पाहिलेले स्वप्न ते महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास त्याने देशदूत संवाद कट्ट्यात उलगडला. डोके अतिशय शांत ठेवत आपले सर्व डाव हातचे राखून अखेरीस एकेरी पट डाव टाकत गुण वसुल करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्याचे गुपित त्याने सांगीतले.

- Advertisement -

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नेमके काय डावपेच होते?

महाराष्ट्र केसरीच्या लॉटस पडल्यानंतर आपली लढत कोणत्या संभाव्य मल्लांशी होईल याचे आखाडे बांधत त्या मल्लाचा पुर्ण अभ्यास आपण केला. त्यांच्या कमजोर बाजु शोधून ठेवल्या. तसेच माझ्या वस्तादांनी मला शिकवलेले मुख्य डाव प्रथम उघड न करता ते राखून ठेवले होते. उपांत्य फेरीत माजी महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेला दुहेरी पट डावाने नमविले. तर शैलेश व मी एकाच तालमितील असल्याने एकमेकांचे डाव माहित होते. परंतु मी त्यासाठी काही डाव राखून ठेवले होते. शेवटच्या काही सेकंदात मी एकेरी पट काढून शैलेशला अस्मान दाखवत गुण वसुल करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

संपुर्ण स्पर्धेत सर्वात आव्हानात्मक लढत कोणती वाटली ?

गादी विभागाच्या अंतिम फेरीत माजी महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेला नमविले. अभिजित मूळचा पुण्याचा असल्याने त्याला मोठा पाठिंबा होता. त्याचसोबत तो आव्हानात्मक मल्ल असल्याने त्याला पराभूत करणे सोपे नव्हते. मात्र, संयम आणि हुशारीने खेळ केला तसेच त्याला दुहेरी पट काढल्याने बाजी मारली. ही लढत जिंकल्यानंतर माझ्यावरील दडपण कमी झाले. म्हणूनच किताबी लढतीत मी पुर्णपणे रिलॅक्स होतो.

महाराष्ट्र केसरीची यापुर्वी संधी हुकली होती?

हे माझे तसेच माझे गुरू यांचे स्वप्न होते. यासाठी कसून तयारी सुरू होती. गेल्या वर्षीच खरे तर मी महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली असती. त्या वेळी मी उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, आमच्या तालीमीतील एका मल्लावर स्पर्धेत अन्याय झाल्याने आम्ही सर्वांनी त्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता.’ यामुळे ही संधी हुकली याची रूखरूख होती. पंरतु मल्लाच्या हक्कासाठी बहिष्कारही महत्वाचा होता.

या स्पर्धेसाठी आहार व कसरीतीची तयारी कशी करत होता?

रोजचा आहारात तीन लीटर दूध, अर्धा किलो बदाम, अर्धा किलो तूप, केळी, सफरचंद, मटण, चिकण, अंडी, पोळ्या, भाकरी, सलाद, पालेभाज्या, थंडाई असा सर्वंकश आहार होता. तर रोत पहाटे पाच वाजता उठणे. दोन ते तीन तास व्यायाम. त्यानंतर कुस्तीचा सराव. दुपारी एक तास व्यायाम. संध्याकाळी दोन ते तीन तास सराव नंतर तर दिवसभर मी तालमीत कसरत करताना दिसत होतो.

कुस्तीकडे कसे वळलास, शिक्षण आणि कुस्तीची सांगड कशी घातलीस?

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळे हे माझे मुळ गाव खूप आडमार्गे आहे. लहानपणापासून मला कुस्तीची आवड होती. यात्रेत कुस्त्या खेळायचो. वडिलांनी प्रगती पाहुण नाशिकला भगूर येथील बलकवडे तालमित पाठवले. येथे आल्यानंतर आपण काहीतरी करू शकतो हा विश्वास वाटला. येथे शिक्षण चालू असताना शालेय कुस्त्यांमध्ये तालुका स्तरावर पहिले यश मिळवले. जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली. परंतु येथे हार झाली. यानंतर मात्र पुन्हा मागे वळून पाहीले नाही. 2010 ला राज्यस्पर्धा जिंकुन राष्ट्रीय स्पर्धेत खेळलो. अनेक बक्षिसे जिंकली. माझ्यातील स्पिरीट पाहुण मार्गदर्शक तसेच राष्ट्रीय पातळीवर खेळलेले विशाल बलकवडे यांनी महाराष्ट्र केसरीची तयारी करून घेतली. तर पुढे तुल्यबळ मल्ल व तयारीसाठी पुणे येथे काका पवार यांच्याकडे पाठवले. येथे 2 वर्षे तयारी केली.

पुढचे ध्येय काय आहे?

सिनीअर नॅशनल, एशियन व पुढे ऑलिंपिक स्पर्धेत खेळून भारतासाठी पदक मिळवण्याचे आपले ध्येय आहे. हे ध्येय बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षापुर्वीच निश्चित झाले असून त्याची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. आणि आपण हे यश मिळवूच हा पुर्ण आत्मविश्वास आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या