लांच्छनास्पद! जन्मदात्यांनीच लेकीला ढकलले वेश्या व्यवसायात; आई-वडिलांना अटक
स्थानिक बातम्या

लांच्छनास्पद! जन्मदात्यांनीच लेकीला ढकलले वेश्या व्यवसायात; आई-वडिलांना अटक

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी

अंबड येथील वावरे नगर परिसरात अल्पवयीन मुलीस वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडून पैसे कमवणार्‍या आई-वडलांना अवैध धंदे विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यासह पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वावरे नगर येथे एका अल्पवयीन मुलीची सावत्र आई व वडिलांनी व्यवसाय करून घेत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तालयास मिळाली. आयुक्तांच्या आदेशाने अवैध व्यवसाय विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिरसाठ, पोलीस नाईक सारंग वाघ, पोलीस शिपाई गजानन पवार, सूरज गवळी आणि संतोष वाघ यांच्या पथकाने सोमवारी (दि.23) सापळा रचला.

या दाम्पत्याकडे तोतया गिर्‍हाइक पाठवून तक्रारीची शहानिशा केली. दाम्पत्य अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करण्यास जबरदस्ती करत असल्याचे यात आढळून आल्याने पथकाने धाड टाकत पीडितेच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यासह पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने परजिल्ह्यात सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

चालक असलेल्या पित्यासह ती नाशिकला राहण्यास आली, मात्र तिच्या सावत्र आईने व पित्याने पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलले. तीच्या वरील अत्याचार पाहुन जागृक नागरीकाने पोलीस आयुक्तालयास ही माहिती दिली. यानंतर ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याकडे 16 मोबाइल, सीडी, दुचाकी, 13 हजार 950 रुपये रोख व इतर साहित्य असा 92 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com