Video: देशदूत संवाद कट्टा : स्वच्छ-सुंदर शहरासाठी जागरुकता गरजेची
स्थानिक बातम्या

Video: देशदूत संवाद कट्टा : स्वच्छ-सुंदर शहरासाठी जागरुकता गरजेची

Gaurav Pardeshi

‘देशदूत’ संवाद कट्ट्यात सामाजिक भान उपक्रमाअंतर्गत ‘थुंकणे’ या वाईट सवयीवर चर्चा

नाशिक | प्रतिनिधी

शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. यासाठी सर्वच थरातून प्रयत्न केला गेला पाहिजे.ठिकठिकाणी थुंंकणे हा मोठा डाग समाजात वाढतो आहे. विविध व्यसनांच्या माध्यमातून आपल्या परिसराच्या अस्वच्छतेत भर घालण्यावर बंधने घालण्यापेक्षा प्रत्येकाने ‘माझे शहर, माझे गाव, माझे घर’ या संकल्पनेतून जागरुकता बाळगल्यास आपले शहर चांगले शहर, सुंदर शहर होण्यास वेळ लागणार नाही, असा सूर ‘देशदूत’ संवाद कट्टातून उमटला.

‘देशदूत’च्या माध्यमातून सामाजिक भान या उपक्रमांतर्गत विविध विषयांवर चर्चा घडवून सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच उपक्रमांतर्गत ‘देशदूत’ संवाद कट्टाच्या माध्यमातून ‘थुंकणे एक सामाजिक भान’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. मानस सुळे, मानव उत्थान मंचच्या भारती जाधव, स्वच्छता दूत सुरेश शिरोडे व ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सहभाग घेतला होता.

समाजात मुलांवरील संस्कार व तरुणांमध्ये वाढती व्यसनाधिनता व बेजबाबदारीतून केल्या जाणार्‍या वर्तनातून समाजमनावर होणारे परिणाम या विषयावर मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी इमारती सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणांवर अतिशय बेदरकारपणे लोकांना तोंडातील गुटखा, तंबाखू, पान, आदींसह विविध प्रकारातून निर्माण होणार्‍या थुंकीला बेधडकपणे थुंकताना पाहिले जाते. हीच क्रिया आपल्या घरात अथवा कार्यालयाच्या आत होत नाही, मग सार्वजनिक ठिकारी कां केली जाते याबाबत मान्यवरांनी नागरिकांच्या संस्कारातील त्रुटींवर बोट ठेवले. हेच नागरिक परदेशात जातात तेव्हा सर्व नियम प्रामाणिकपणे पाळतात.मात्र मायदेशात तेच बेदरकार झाल्याचे दिसून येतात. या मानसिकतेवर विचार करण्याची गरज आहे.

अनेक इमारतीच्या जिन्यांमध्ये पायर्‍यांच्या कोपर्‍यांवर देवादिकांचे फोटा ेलावून या थुंकी बहाद्दरांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यालाही न जुमानणार्‍यां या महाभागांवर कायद्यानेच कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पूर्वी वृध्द घरात मुलांना प्रबोधन करीत होते. सामाजिक भान शिकवत होते. त्यातून मुलांमध्ये संस्कार रुजत होते. आज त्याचा अभाव दिसून येतो. शाळांच्या माध्यमातून पुन्हा लहान मुलांवर संस्काराची चर्चा होते. मात्र तरुणांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचा सूरही यावेळी उमटला.मी केले तर काय होते. ही भावना तरुणांमध्ये बळावू लागलेली आहे. त्यामुळे एकतर त्यांच्या व्यसनाधिनतेवर काम होणे गरजेचे आहे. तसेच त्यांना सामाजिक भान मिळवून देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

Deshdoot
www.deshdoot.com