9 करोना संशयित सिव्हिलमध्ये दाखल
स्थानिक बातम्या

9 करोना संशयित सिव्हिलमध्ये दाखल

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयातील करोना विषाणू आजार विलगीकरण कक्षामध्ये गेल्या 22 तासांमध्ये परदेशातून आलेले नऊ व झाकिर हुसेन रूग्णालयात एक असे 10 करोना संशयित दाखल झाले आहेत.

या दहाही रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे रात्री पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, एकीकडे कोरोना विषाणूची दहशत असताना, स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले असून विशेष कक्षातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर एकाचा रिपोर्ट प्रलंबित आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात बुधवारी (दि.18) रात्री दुबईतून आलेल्या दोघांना दाखल करण्यात आले. तर, गुरुवारी (दि. 19) सायंकाळपर्यंत सात कोरोना संशयित दाखल झाले.

या कक्षात सध्या नऊ कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. यात दुबईतून आलेले दोन, फिन्लॅण्ड येथे पर्यटनानंतर आलेले एकाच कुटूंबातील तिघे(एक लहान मुलगी), मलेशियातून दोन, अमेरिकेतून एक, जर्मनीतून एक असे नऊ कोरोना संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. तर महापालिकेच्या जाकिर हुसैन रुग्णालयात दुबईतून आलेला एक कोरोना संशयित रुग्ण दाखल आहे. यानुसार सध्या शहरात 10 कोरोना संशयित रुग्ण विलगीकरण कक्षांमध्ये दाखल आहेत. या सर्वांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असून, त्यांचे रिपोर्ट शुक्रवारी (दि.20) सायंकाळपर्यंत मिळणार आहे.

कोरोनो संशयितांची आकडेवारी
* कोरोनाग्रस्त देशातून नाशिक शहर-जिल्ह्यात आलेले एकूण नागरिक : 189
* 14 दिवसांचे सर्वेक्षण झालेले नागरिक : 31
* दैनंदिन सर्वेक्षणातील नागरिक : 158
* प्राप्त निगेटिव्ह रिपोर्ट : 31
* प्रलंबित रिपोर्ट : 10
* सध्या विलगीकरण कक्षात दाखल : 10

देशातून आलेले नागरिक :
* युएई : 74
* सौदी : 9
* अमेरिका : 9
* इटली : 12
* जर्मनी : 7
* युके (इंग्लंड) : 9
* इराण : 8
* चीन : 5
*अन्य देश : 56
* एकूण : 189

Deshdoot
www.deshdoot.com