नगर शहरात पाणीपट्टी 10 टक्क्यांनी वाढली
स्थानिक बातम्या

नगर शहरात पाणीपट्टी 10 टक्क्यांनी वाढली

Sarvmat Digital

दुप्पट आकारणीचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध कारणांची जंत्री देत पाणीपट्टीमध्ये वाढ करणे कसे अयोग्य आहे, हे पटवून देण्याचा एकीकडे प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून 10 टक्के पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय स्थायी समितीने गुरुवारी झालेल्या सभेत घेतला. यावर महासभेत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘ना नफा, ना तोटा’ या धर्तीवर पाणी योजना चालविणे आवश्यक असताना येथील पाणी योजना मात्र 32 कोटी रुपये तोट्यात चालविण्यात येत आहे. वार्षिक खर्च 32 कोटींच्या आसपास असताना प्रत्यक्षात उत्पन्न मात्र 12 कोटी रुपये आहे. प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात तोटा वाढत चालल्याने प्रशासनाने पाणीपट्टीत वाढ करण्याची शिफारस केली होती.

\यापूर्वी 2003 साली पाणीपट्टीत वाढ झाली होती. त्यावेळी 806 रुपये पाणी होती, ती दीड हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. शहराचा वाढता व्याप, उपशासाठी लागणारी वीज, विजेचे वाढते दर आणि पाटबंधारे खात्याकडून कच्च्या पाण्याचे वाढणारे दर हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येकवर्षी किमान 10 टक्के पाणीपट्टीत वाढ करणे आवश्यक असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र प्रत्येकवेळी पाणीपट्टी वाढ करण्यात टाळाटाळ केल्याने पाणीयोजना आर्थिक संकटात सापडली आहे.

पाणीपट्टीत वाढ करणे कसे आवश्यक आहे, याबाबत प्रशासनाने वारंवार स्थायी समिती आणि महासभेला सांगितलेले आहे. मात्र नागरिकांवर करांचा बोजा लादायचा साप आपल्या हातून मारला जाऊ नये, यासाठी प्रत्येकाने या प्रस्तावाला चार हात लांब ठेवले. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही पाणीपुरवठा वेळेवर होतो का, दररोज होतो का, पूर्ण दाबाने होतो का, असे प्रश्न उपस्थित करून पाणीपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव मागे ठेवण्याचा किंवा महासभेकडे पाठविण्याचा प्रयत्न होता. मात्र गणेश भोसले यांनी एकदम दुप्पट वाढ करणे जसे चुकीचे आहे, तसेच अजिबात वाढ न करणेही चुकीचे होईल, असे सांगत 10 टक्के वाढ करण्याची शिफारस केली.

महापालिकेतर्फे शहरात अर्धा, पाऊण आणि एक इंची नळजोड देण्यात आलेले आहेत. या सर्वांच्या दरात आता 10 टक्के वाढीचा ठराव स्थायी समितीने घेतला आहे. अर्धा इंचीसाठी दीड हजार, पाऊण इंचीसाठी तीन हजार आणि एक इंचीसाठी सहा हजार दर आकारण्यात येतो. त्यापैकी अर्धा आणि पाऊण इंची नळाद्वारे पाणी घेणार्‍यांना दुप्पट म्हणजे अनुक्रमे तीन आणि सहा हजार आणि एक इंची नळाद्वारे पाणी घेणार्‍यांना दहा हजार पाणीपट्टी आकारण्याची शिफारस प्रशासनाने केली होती.

ती फेटाळत सर्व दरांमध्ये दहा टक्के वाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा विषय आता महासभेकडे जाणार असल्याने 19 फेब्रुवारीपूर्वी महासभा झाली, तरच कर आणि दर वाढीचे विषय त्यात घेतले जाऊ शकतील. त्यामुळे महासभा कधी होणार आणि झाल्यानंतर पाणीपट्टीत यापेक्षा अधिक वाढ होणार का, याकडे शहराचे लक्ष आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांच्या खिशालाही चाट
रस्त्यावर विविध वस्तू, भाजी, पदार्थ, मांस याची विक्री करणार्‍यांवरही आता अधिकचा बोजा पडणार आहे. रस्ता बाजू शुल्कपोटी आतापर्यंत प्रतिदिन 10 रुपये घेतले जात होते. ते आता 20 रूपये करण्यात आले आहेत. मांस विक्री करणार्‍यांकडून प्रतिदिन पाच रुपये आकारले जायचे, त्यात 10 रूपये अशी वाढ केली आहे. तसेच रात्रीच्यावेळी पदार्थ, दूध व अन्य हातगाडी विक्रेत्यांना प्रतिदिन 15 रुपये आकारले जायचे, ते आता 30 रूपये करण्यत येणार आहेत. स्थायी समितीने हा विषय अजेंड्यावर नसतानाही या दरवाढीस मान्यता दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com