Wednesday, May 8, 2024
Homeनगरमहापालिका अडीच हजार घरांवर लक्ष ठेवणार

महापालिका अडीच हजार घरांवर लक्ष ठेवणार

कोरोना बाधितांचा परिसर नजरेखाली : आठ पथकांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णांच्या घराचा व ते करीत असलेल्या व्यवसायाचा परिसर महापालिकेकडून पिंजून काढण्यात येणार आहे. तेथे फवारणी व इतर उपाययोजना करतानाच या परिसरातील प्रत्येक घरातील व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने आठ पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

महापालिकेतर्फे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांसंदर्भात मायकलवार यांनी माहिती दिली. यावेळी उपायुक्त सुनील पवार व डॉ. प्रदीप पठारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे उपस्थित होते. मायकलवार म्हणाले, शहरामध्ये आतापर्यंत तीन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. यातील तिसर्‍या रूग्णाची हिस्ट्री तपासण्यात येत आहे. मात्र या तिनही रूग्णाच्या घराचा व ते व्यवसाय करत असलेल्या परिसरावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. या परिसरात सुमारे अडीच हजार घरे असून, या परिसरात कोणाला या आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचारासाठी रवाना करण्यात येणार आहे.

रोज अडीच हजार घरांमध्ये हे पथक जाणार आहे. ताप, दम लागणे, न्युमोनिया अशा प्रकारची काही लक्षणे आढळल्यास संबंधितास उपचारासाठी नेले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या फिरत्या दवाखान्यांचा वापरही करण्यात येणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरातच घरोघरी जाऊन माहिती घेण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे तसा पूर्ण प्लॅन आखण्यात आलेला आहे. यासाठी लागणार्‍या वाहनांचीही रितसर परवानगी काढण्यात येणार आहे.

शहरात सध्या सोडियम हायपर प्रोराईटची फवारणी करण्यात येत आहे. रूग्ण आढळलेल्या परिसरात प्रथम ही फवारणी केली जात आहे. त्यानंतर बाजारपेठेचा भाग, मार्केट कमिटी, भाजी मार्केट परिसर, गर्दीची व रहदारीची ठिकाणे व नंतर संपूर्ण शहरात ही फवारणी करण्यात येणार आहे. काही खासगी संस्थांनीही यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याशीही संपर्क सुरू असून, संपूर्ण काळजी घेत हे काम करणार्‍यांची मदत घेतली जाणार आहे.

नागरिकांना भाजीपाला व अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित व्हावा,यासाठीही पावले उचलली जात आहेत. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत असून, भाजी विक्रीसाठी फेरीवाल्यांना परवानगी आहेच. परंतु शहरात झोननिहाय काही ओपनस्पेस ताब्यात घेऊन तेथे ठराविक वेळसाठी भाजीविक्रीची व्यवस्था करता येईल का, याचाही चाचपणी केली जात आहे. हे करताना स्वच्छता निरीक्षकांकडून त्या ठिकाणी सोशल डिस्टस्टिंगसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

यामध्ये भाजी खरेदीसाठी आलेल्यांनी एकमेकांपासून किती अंतरावर उभे रहायचे, भाजी विक्रेत्याने त्यांचा माल ठेवण्यासाठी किती जागा वापरायची, भाजीविक्रेता आणि ग्राहक यांच्यातील अंतर या सर्व बाबी पाहिल्या जातील. तसे त्यांना आखून दिले जाईल. हीच काळजी किराणा माल खरेदी करणार्‍यांसाठीही घेतली जाणार आहे. किराणा माल किरकोळ विक्रेत्यांचा माल संपला असल्यास त्यांना ठोक विक्रेत्यांकडून तो पोहोच होण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. त्यासाठी ठोक विक्रेत्यांशी चर्चा केली आहे. त्यांना ठराविक वेळ देऊन त्या वेळेत वाहनांद्वारे किरकोळ विक्रेत्यांपर्यंत माल पोचविण्यात येणार आहे.त्यासाठी लागणार्‍या वाहनांचीही रितसर परवानगी काढण्यात येणार असल्याचे आयुक्त मायकलवार यांनी सांगितले.

असे करा घर स्वच्छ
बाहेरून ये-जा असल्याने घरामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 320 ग्रॅम ब्लिचिंग पावडर 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याने घराची स्वच्छता करण्याचे आवाहन उपायुक्त सुनील पवार यांनी केले.

येथे मात्र दुर्लक्ष
जनता कर्फ्यूच्या दिवशी महापालिकेत प्रवेशद्वारावर सॅनिटायझर घेऊन एक कर्मचारी उभा होता. येणार्‍या-जाणार्‍याच्या हातावर ते टाकण्यात येत होते. गुरूवारी महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मात्र ही कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचे प्रकर्षाने समोर आले. येणारे, जाणारे महापालिकेत बिनधास्त फिरत होते. स्वच्छता विभागाला याबाबत विचारणा केली असता त्यांनीही यावर मौन पाळणे पसंत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या