Thursday, April 25, 2024
Homeनगरअकोले: सभापतीपदी बोर्‍हाडे तर उपसभापतीपदी देशमुख

अकोले: सभापतीपदी बोर्‍हाडे तर उपसभापतीपदी देशमुख

अकोले (प्रतिनिधी)-  अकोले तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपचे दत्तात्रय बोर्‍हाडे व उपसभापती भाजपचेच दत्तात्रय देशमुख हे विजयी झाले. त्यामुळे अकोले तालुका पंचायत समितीवर पहिल्यांदाच कमळ फुलले आहे.

पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकरिता काल दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे उपस्थित होते.

- Advertisement -

सभापतिसाठी भाजपचे दत्तात्रय बोर्‍हाडे व शिवसेनेचे नामदेव आंबरे तर उपसभापती पदासाठी भाजपकडून दत्तात्रय देशमुख व राष्ट्रवादीकडून विजयी झालेले व आता पिचड पिता पुत्र यांची साथ सोडून विरोधात गेलेले गोरख पथवे यांच्यात निवडणूक झाली. सात विरुद्ध पाच मतांनी सभापतिपदी बोर्‍हाडे तर उपसभापतिपदी देशमुख विजयी झाले.

गेली अडीच वर्षे शिवसेनेचे सभापती व उपसभापती होते. अकोले पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग असल्याने गेल्या आठ दिवसांपासून खलबते सुरू होती. सभापतिपदासाठी भाजप पक्षाकडून दत्तात्रय बोर्‍हाडे तर शिवसेनेचे नामदेव आंबरे आणि उपसभापती पदासाठी भाजपाकडून दत्तात्रय देशमुख तर राष्ट्रवादीकडून गोरख पथवे तर शिवसेनेकडून देवराम सामेरे यांनी अर्ज दाखल केले होते.

याप्रसगी पंचायत समितीच्या 12 सदस्यांतून हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी सभापती पदासाठी आघाडीचे नामदेव आंबरे यांना 5 मते मिळाली तर भाजपाचे दत्तात्रय बोर्‍हाडे यांना 7 मते मिळाली. तसेच उपसभापती पदासाठी देवराम सामेरे यांनी माघार घेतल्याने आघाडीचे गोरख पथवे यांना 5 तर भाजपाचे दत्तात्रय देशमुख यांना 7 मते मिळाली. भाजपचे दत्तात्रय बोर्‍हाडे सभापती तर दत्तात्रय देशमुख याची उपसभापती म्हणून विजयी झाल्याची बातमी सभागृहाबाहेर समजताच परिसरात उपस्थित असलेले माजी आमदार वैभवराव पिचड व भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडीनंतर एकच जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

विजयी उमेदवारांची सवाद्य मिरवणूक काढून भाजप कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, जिल्हा परिषेदेतील भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर आभार ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव यांनी मानले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता गोरख पथवे होते. परंतु तीन सदस्यांनी गटनेते बदल करून सीताबाई गोंदके यांची निवड केली. यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली. मात्र हा बदल मान्य न झाल्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पंचायत समितीचे मावळते उपसभापती व सेनेचे गटनेते मारुती मेंगाळ यांनी दै. सार्वमतशी बोलताना सांगितले.

सभापती-उपसभापती निवडीच्या वेळेस यापूर्वी दोन वेळा घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे पंचायत समिती व परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

पंचायत समितीतील गब्बर सिंगची हुकूमशाही संपविण्याचे काम पंचायत समिती सदस्यांनी निवडीच्या माध्यमातून केले असल्याचा टोला सेनेचे नेते व माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांना नाव न घेता लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या