निसर्ग’ वादळाने अकोले तालुक्यात पॉलिहाऊस आणि शेडनेटचे मोठे नुकसान
स्थानिक बातम्या

निसर्ग’ वादळाने अकोले तालुक्यात पॉलिहाऊस आणि शेडनेटचे मोठे नुकसान

Sarvmat Digital

ब्राह्मणवाडा (वार्ताहर) : अकोले तालुक्यातील बेलापूर, ब्राह्मणवाडा परिसरात काल वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. हा पाऊस खरीप पेरणीपूर्व मशागतीस उपयुक्त ठरणार आहे. मात्र वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.घरांवरचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी विजेचे पोल पडले तसेच वीज वाहक तारा तुटल्या असून काल पासून वीज पुरवठा खंडित असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ऊस, मका, उन्हाळी कांद्याचे नुकसान

वीरगाव (वार्ताहर)- ‘निसर्ग’ वादळ आणि मुसळधार पावसाने अकोले तालुक्याच्या आढळा परिसरातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले.शेतातील  ऊस,मका या पिकांनी वादळात लोळण घेतली. वादळात झालेला मान्सूनपुर्व पाऊस मात्र खरीपाच्या पेरणीपुर्व मशागतीला वेग देईल.वीरगाव येथे पॉलिहाऊस आणि शेडनेट उडून गेल्याने शेतक-यांना तब्बल ५० लाखांपेक्षा अधिक फटका बसला.
आढळा परिसरातील वीरगाव,हिवरगाव,सावरगाव पाट,डोंगरगाव,देवठाण,समशेरपूर,गणोरे,पिंपळगाव यासहित इतर सर्व गावांमध्ये बुधवारी दुपारनंतर या वादळवा-यांचे आगमन झाले.ताशी ५३ किलोमीटर वेगाने वादळ घोंघावत असल्याची नोंद वीरगावच्या कृषी संजीवनी गटाच्या हवामान केंद्रात झाली.यावेळी जोरदार पाऊस कोसळला.वीरगाव परिसरात ५२ तर आढळा धरणाच्या पाणलोटात ४५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.
पावसापेक्षा वादळाची तीव्रता अधिक होती.वादळामुळे शेतातील ऊस आणि मका पिकाचे मोठे नुकसान झाले.हवामान खात्याने वादळाचा ईशारा आगाऊ वर्तविल्याने शेतक-यांनी उन्हाळी कांदा शक्य होईल त्या ठिकाणी साठवून ठेवला होता.साठविलेल्या कांद्यालाही वादळातील पावसाच्या धारांनी भिजविल्याने कांद्याचे मोठे नुकसान होईल.
वीरगाव परिसरात वीजेचे खांब कोसळल्याने सर्वत्र अंधारच होता.शिवारातील अनेक छोटी-मोठी  झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले.सावरगाव पाट येथील संदीप बाळचंद नेहे यांचे पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले.डाळींबाची झाडेही अनेक ठिकाणी मुळापासून उखडली.
झालेल्या पावसाने मात्र शेतांमध्ये आणि बांधबंदिस्तीत मोठे पाणी साठले होते.रोहिणी नक्षत्राच्या उत्तरार्धात आलेल्या निसर्ग वादळातील पावसाने मात्र खरीपाची पेरणीपूर्व मशागत वेग घेईल.

शेडनेटचे आणि पॉलिहाऊसचे मोठे नुकसान

वीरगावात  शेतक-यांनी ४०एकर शेतीवर शेडनेट  उभारली आहे. या शेडनेटचे वादळात मोठे नुकसान झाले. वीरगाव येथील विरेंद्र थोरात आणि दिनकर थोरात यांचे पॉलिहाऊसला लाखोंचा फटका बसला. भाऊसाहेब वाकचौरे, नानासाहेब वाकचौरे,रामकिसन तोरकड,संदीप तोरकड,साहेबराव पानसरे,विश्वास भांगरे,बाळासाहेब तोरकड,विनायक शेळके आणि हिवरगाव आंबरे येथील ठका लुमा मधे,बाळासाहेब मधे,देवराम मेंगाळ यांचे शेडनेटचे वादळाने मोठे नुकसान केले.या शेतक-यांना वादळाने लाखोंचा फटका दिला.झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करावे अशी मागणी होत आहे.

कोतुळ परिसरात वादळी पावसाने नुकसान

कोतुळ( वार्ताहर)- अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात काल वादळी व मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले .ठीक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर  झाडे उन्मळून पडले , काही ठिकाणी विजेचे पोल कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला .शेतकऱ्यांच्या कांदा पिकाची नुकसान झाली.

लहीत बुद्रुक येथे भिंत पडून एक जण ठार

लिंगदेव (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील लिंगदेव परिसरात काल झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने मोठे नुकसान  झाले आहे.  सोसाट्याच्या वाऱ्याने  लहीत बुद्रुक  येथे सागर पांडुरंग चौधरी यांच्या अंगावर भीत पडल्याने दवाखान्यात उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला तसेच काही ठिकाणी घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले असून कांद्याचे भिंजुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .आधीच करोनामुळे शेतकरी संकटात सापडला  असतांना वादळी पावसाने आर्थिक संकट वाढविले आहे .

इंदोरी, रूंभोडीतील ऊस, मका, अंबा, वेलवर्गीय पिकांचे नुकसान

इंदोरी (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील इंदोरी, रूंभोडीतील ऊस ,मका ,अंबा, वेलवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. पेरणीपूर्व मशागतीनां  वेग येणार आहे. रात्रभर वीजपुरवठा खंडित  होता.  या वादळी पावसाने काल नागरिकांनी निसर्गाचा रुद्रावतार अनुभवला.

समशेरपुर आणि परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा

समशेरपुर (वार्ताहर)- अकोले तालुक्याच्या आढळा पट्टयातील समशेरपुर आणि परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे तसेच पॉलिहाउस व शेडनेटचे नुकसान झाले आहे.
समशेरपुर व परीसरात काल सकाळपासून पाऊससुरु होता दुपारनंतर जोरदार वारा आणि प्रचंड पावसाला सुरुवात झाली यातच समशेरपुर ते सिन्नर रस्त्यावर झाडे उन्मळुन पडल्याने रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण झाला घोडसरवाडी येथे विजेच्या धक्क्याने एक म्हैस तसेच समशेरपुर येथील संकरित गाय पावसाने दगावली,  सर्वात मोठे नुकसान टाहाकारी येथे झाले येथील रहिवासी भाऊसाहेब यशवंता एखंडे यांचे पॉलीहाऊसचे अंदाजे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले.
तसेच टाहाकारी येथीलच रावसाहेब कोंडाजी एखंडे यांचे पॉलीहाऊसचे अंदाजे दीड लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, जोरदार वारा आणि पावसामुळे शिवारात साठवलेला कांदा व इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
Deshdoot
www.deshdoot.com