Saturday, April 27, 2024
Homeनगरअजित पवारांसोबत रोहित यांचीही एन्ट्री

अजित पवारांसोबत रोहित यांचीही एन्ट्री

मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता सोमवारचा मुहूर्त || नगरच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी ठोकणार दावा

मुंबई/अहमदनगर – राज्यातील महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता नवा मुहूर्त समोर आला आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार सोमवार, दि.30 डिसेंबर रोजी नव्या मंत्र्यांचा शपथविधी निश्चित मानला जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीत सहमती झाल्याचे समजते. तर नगर जिल्ह्यातून शरद पवारांचे नातू आ.रोहित पवार यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तसे घडले तर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी दावा ठोकण्यास मोकळी होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तसेच त्यांनतर उपमुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते. मात्र त्याबाबत पक्षातील कोणताही नेता थेट प्रतिक्रीया देण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्रीपद मिळाले तरी त्यांच्याकडे विभाग कोणता असेल, याची खुद्द राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली.

त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी शपथविधी झाल्यास शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, असे सुत्रांनी सांगीतले. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून तरूण नेतृत्वाला संधी मिळावी म्हणून दबाव सुरू झाला आहे. जामखेडचे आ.रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा पक्षवर्तुळात सुरू झाली आहे. प्रारंभी आ.रोहित यांना संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र आता त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

नगर जिल्ह्यातील वर्चस्व मजबूत करण्यासोबत पक्षविस्तारासाठी त्यांचे नेतृत्व बळकट करण्याच्या उद्देशाने संधी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचा दावा केला जात आहे. नगर दक्षिण जिल्ह्यातून आ.रोहित यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होते. आताही पक्षाचे जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. मात्र आ.रोहित यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास राष्ट्रवादीकडून पालकमंत्रीपदावर दावा ठोकला जाईल, असे मानले जाते.

पदापेक्षा काम महत्त्वाचे : आ. पवार
मला मंत्रिपद मिळावे, यासाठी सर्वत्र चर्चा होत असते. माझ्यासाठी कार्यकर्ते सुद्धा वरिष्ठांना भेटले असतील. माझ्यासाठी पदापेक्षा काम महत्त्वाचे आहे. मतदारसंघातील अनेक प्रकारची कामे रखडली आहेत. त्यामुळे मला सर्व खात्यांची गरज आहे. या महिनाअखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून सध्या केवळ लोकहिताचे काम करण्यास आमचे प्राधान्य आहे, असेही आ.पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काँग्रेसवर खापर फोडणे योग्य नाही : ना.थोरात
मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबाचे खापर काँग्रेसवर फोडणे योग्य नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. शपथविधीचे काही प्रोटोकॉल असतात. त्यासाठी वेळ लागतो, असे त्यांनी एका वेबवाहिनीशी बोलताना सांगितले. दरम्यान, काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. परंतु, केवळ अशोक चव्हाण यांचाच मंत्रिमंडळात समावेश होणार असून, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचा विचार पक्षश्रेष्ठींकडून सुरू असल्याचे समजते. पक्षात मंत्रिपदासाठी मोठी चुरस आहे. त्यामुळे अंतिम यादीचा घोळ मिटलेला नाही, अशी चर्चा आहे.

चर्चा तर होणारच !
नगर जिल्ह्यातून मंत्रिपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. त्यापाठोपाठ आणखी कोण, यावरून चर्चा रंगल्या आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते आणि सेनेचे सहयोगी आमदार शंकरराव गडाख यांच्या नावाची चर्चा झाली. त्यानंतर जामखेडचे आ.रोहित पवार, कोपरगावचे आ.आशुतोष काळे, राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे, नगरचे आ.संग्राम जगताप यांच्या नावाचीही चर्चा रंगली. मात्र विस्ताराचा घोळ वाढत गेल्याने या चर्चाही विरत गेल्या. मात्र आता पुन्हा एकदा विस्तार तोंडावर असल्याने समर्थकांनी आपल्या नेत्यासाठी रेटा वाढवला आहे. आ.रोहित यांचे नाव चर्चेत आघाडीवर आहे. अन्य आमदारही आपल्यापरीने फिल्डींग लावत असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या