दोन वाहनांच्या धडकेत एक ठार; तिघे जखमी
स्थानिक बातम्या

दोन वाहनांच्या धडकेत एक ठार; तिघे जखमी

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – इको स्पोर्ट (क्र. एमएच- 12 केई- 6806) आणि छोटा हत्ती या दोन वाहनांच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहे. हा अपघात नगर- पुणे रोडवरील चास (ता. नगर) शिवारात रासकर वस्तीजवळ गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शिंदे, महिला पोलीस कर्मचारी गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संसार उपयोगी साहित्य घेऊन छोटा हत्ती पुण्याकडून बीडच्या दिशेने जात होता. यामध्ये दोन व्यक्ती होत्या. तर, इको स्पोर्ट मधील तिघे जण नगरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते. चास शिवारात छोटा हत्ती वाहनाचा टायर फुटल्याने समोरुन येणाऱ्या इको स्पोर्टला छोटा हत्तीची धडक बसली.
यामध्ये छोटा हत्ती मधील एक जण जागीच ठार झाला आहे. तर, अन्य तिघे जण जखमी झाले आहे. मृत व जखमीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. वाहनामध्ये सापडलेले काही कागदपत्रांच्या आधारे ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
Deshdoot
www.deshdoot.com