43 लढाऊ वैमानिक देशसेवेसाठी सज्ज; कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलचा दीक्षांत समारंभ

jalgaon-digital
2 Min Read

नाशिकरोड । प्रतिनिधी

युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये काल 43 वैमानिकांचा दिक्षांत समारंभ पार पडला.

यावेळी वैमानिकांच्या तुकडीने ‘कदम-कदम बढाये जा, खुशीके गीत गाये जा’ या धूनवर संचलन करत वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांना मानवंदना दिली. लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते 40 वैमानिकांसह तीन प्रशिक्षकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त संचालक मेजर जनरल अजयकुमार सुरी यांनी जवानांना संबोधित करताना, धाडस व तंत्र कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिकच यशस्वी होऊ शकतो.

सुरक्षित उड्डाणासोबत शारीरिक व मानसिक आरोग्यदेखील उत्तम असणे हे चांगल्या कुशल वैमानिकासाठी गरजेचे असते. एव्हिएशन स्कूलच्या उत्तम व्यासपीठावरुन तुम्ही भारतीय सेनेत दाखल झाल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण कामगिरीवर भर देण्याचे सूचित केले. लष्कराच्या युद्ध सज्जतेची तयारी जवानांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकातून दिसले. चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने रंगलेला दीक्षांत सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला.

आपल्याकडील युद्धसामुग्री, अधिकारी व जवानांच्या बळावर बलाढ्य शत्रूलाही पाणी पाजण्याची ताकद लष्कराकडे आहे. शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी रणनीती आखून लष्कराने केलेला हल्ला, अचूक लक्ष्यवेध, अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचे सामर्थ्य ‘ऑपरेशन विजयद्वारे’ कॅटसच्या वैमानिकांनी घडवून भारतीय सैन्य कोणताही हल्ला परतवण्यास सक्षम असल्याचे दाखवले.

गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आमी एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. यामध्ये शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमीना सुरक्षित ठिकाणी उपचार्थ हलविणे आदीसह विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते.

यांचा झाला गौरव

प्रशिक्षण कालावधीत सर्वच विषयांमध्ये नैपुण्य दाखवित अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल कॅप्टन अनुज राजपूत यांना सिल्व्हर चित्ता स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कॅप्टन अंकीत आहुजा हे उत्कृष्ट गनर ठरले त्यांना कॅप्टन पी.के. गौर स्मृतिचिन्ह देण्यात आले. उत्कृष्ट ग्राऊंड सब्जेक्टमध्ये कॅप्टन अमित सिंग यांनी एअर ऑब्झरवेशनमध्ये बाजी मारली. तर विशेष प्राविण्यासाठी मेजर प्रदीप अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणार्‍या ट्राफीचे मानकरी मेजर आदित्य जैन ठरले. उत्कृष्ट उड्डाण कौशल्यासाठी मेजर अंजिष्णू गोस्वामी यांना गौरविण्यात आले. सर्व प्रशिक्षणार्थी देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *