कोरोना : लासलगाव, पिंपळगाव नजीकमध्ये केली जातेय फवारणी

लासलगाव | वार्ताहर

नाशिकमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्यानंतर निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक, लासलगाव परिसरात फवारणी केली जात आहे. नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे.

हा रुग्ण कोणकोणत्या परिसरात फिरला, कुणाकुणाच्या तो संपर्कात आला असावा यापार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग तसेच स्थानिक आशा सेविका शहरात फिरून विचारपूस करत आहेत. तसेच आरोग्य विभागाचे ९० जणांचे पथक लासलगावमध्ये येणार असून हे पथक संशयित रुग्णांची तपासणी करणार असल्याचे समजते.

दरम्यान, पिंपळगाव नजीक येथे आज सकाळपासून फवारणी केली जात आहे. परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नसून घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर शहरतील पोझिटिव्ह  असलेले बरेच रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नये, आपल्यासोबत तज्ञ डॉक्टरांची मोठी टीम आहे, आरोग्य विभागाकडून वेळोवेळी काळजी घेतली जात आहे.

परिसर निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसरीकडे कोरोना पोझिटिव्ह आलेल्या रुग्णाने लासलगावमध्ये उपचार घेतले होते, या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मध्यरात्री रुग्णाच्या चार नातेवाईकांना देखील ताब्यात घेण्यात आले असून या रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाचे ९० जणांचे पथक लवकरच याठिकाणी दाखल होणार असून संपर्ण परिसरातील नागरिकांची ते तपासणी करणार असल्याचे समजते. परिसर सील करून पुढील तपासणी केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.