Friday, April 26, 2024
Homeनाशिककोरोनाची अफवा; मालेगाव तालुक्यातील उपसरपंचाला अटक

कोरोनाची अफवा; मालेगाव तालुक्यातील उपसरपंचाला अटक

मालेगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पोहाणे येथील एका इसमास कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याची खोटी अफवा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सोशल मिडियाव्दारे पसरविणार्‍या अजंग येथील उपसरपंच सिध्दार्थ निंबा गरूड यास वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी दिली.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी अजंग-वडेल परिसरात पोहाणे येथील तरूणास कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची पोस्ट व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये गरूड याने टाकल्याने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडून जनतेत घबराटीचे वातावरण पसरले होते. या पोस्टची गंभीर दखल घेत पोलिसांतर्फे खात्री करण्यात आली असता सदरची पोस्ट ही अफवा असल्याचे उघडकीस आले होते. सदर पोस्ट सिध्दार्थ गरूड याने व्हायरल केल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनतेत भितीसह घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन यंत्रणेतर्फे लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात येवून या विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यास्तव विविध उपाययोजना अंमलात आणण्यात येवून जनतेस घरातच थांबण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे.

असे असतांना करोना विषाणू संदर्भात जनतेत घबराट निर्माण होईल, अशा अफवा सोशल मिडियाव्दारे काही जणांतर्फे फैलावण्यात येत असल्याने अशा समाजकंटकांविरूध्द गुन्हे दाखल करत कारवाई करण्याच्या मोहिमेस पोलीस यंत्रणेतर्फे प्रारंभ करण्यात आला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणार्‍यांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या