अज्ञानाच्या अंधकाराची भीती संपवणारा प्रवास..म्हणजे ‘प्रयास’
स्थानिक बातम्या

अज्ञानाच्या अंधकाराची भीती संपवणारा प्रवास..म्हणजे ‘प्रयास’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

माणूस म्हणून जन्म घेतला असतांना आपण समाजाचं काही देणं लागतो या संकल्पनेतून कधी कुणाच्या मदतीचा हात होऊन तर कधी दिव्याची वात होऊन शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड व्हावी व तंत्रज्ञानाच्या अंधकारात असलेल्या वाटसरू ला आपली वाट प्रकाशमय असावी हा दृष्टिकोन ठेऊन ग्रामीण भागात काही ठिकाणी असुविधांमुळे विद्यार्थ्यांना त्यांनी आखलेल्या चौकटी पलीकडे देखील खूप मोठे जग आहे व लहान असतांनाच तेथील चिमुरड्यांच्या जीवनातील प्रकाशवाटा अंधार संपवणाऱ्या असाव्या या दृष्टीकोनातून क.का.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या सात वर्षांपासून ‘प्रयास युवा मंच’ अविरतपणे काम करत आहे.

आदिवासी पाड्यांवर प्रत्येक शैक्षणिक वर्षात सात दिवसीय शिबिर आयोजित केले जाते. यावर्षी हे शिबीर ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान ‘प्रयास’ चे सात दिवसीय शिबिर नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका परिसरात आयोजित करण्यात आले होते. सात दिवसीय शिबिराचे ठिकाण शासकीय आश्रमशाळा,आसरबारी येथे ठेवण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १०० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

शिस्तबद्ध झालेल्या अशा शिबिरादरम्यान जवळपास ५४ शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांनी स्वतः शाळेत जाऊन ज्ञानदानाचे काम केले. या शाळांमध्ये जि.प. प्राथमिक, माध्यमिक तसेच शासकीय आश्रमशाळांचा समावेश होता. शिबिरादरम्यान तब्बल सात हजार पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थांना संगणकाबरोबरीनेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्याच्या हेतूने मजेतून शिकविणारी वैज्ञानिक खेळणी, वैदिक गणित, सामान्यज्ञान, करियरविषयक मार्गदर्शन याच बरोबर दहावी व बारावीचे विद्यार्थी आता परीक्षेच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले आहेत त्यांना पेपर कसे लिहावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.

शालेय विद्यार्थांना योग्य पद्धतीनेच मार्गदर्शन होण्यासाठी सर्व स्वयंसेवकांचे शिबिरपूर्व प्रशिक्षण वर्ग तसेच चर्चासत्रे आयोजित केली जातात.

शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी पथनाट्याद्वारे महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, बेटी बचाव, सार्वजनिक स्वच्छता यांसारख्या ग्रामीण भागांतील ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला यावेळी गावकऱ्यांचा उत्साहदेखील चांगला होता.

कब्बडी, खो-खो, धावणे यांसारख्या मैदानी तसेच निबंधलेखन, वक्तृत्व, चित्रकला यांसारख्या शालेय विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धाचे आयोजित करण्यात आले. या स्पर्धांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळत सुमारे ७०० पेक्षा अधिक शालेय विद्यार्थांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला.

प्रत्येक स्पर्धांमधून प्रथम तीन क्रमांकास चषक, मेडल, व शालेय उपयोगी वस्तू तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकांस ‘प्रयास’ कडून सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी क्रीडा दिनासाठी ज्यांनी प्रांगण उपलब्ध करून दिले व सातही दिवस जिथे निवासी सोय झाली असे शासकीय आश्रमशाळा आसरबारी,तसेच सर्वोत्कृष्ट शाळा जि. प. शाळा खिरकडे व क्रीडा दिनाच्या दिवशी एक सर्वोत्कृष्ट खेळाडु (मुलगी व मुलगा) निवडण्यात आला या सर्वांनाच क्रीडा साहित्य देऊन त्यांना गौरविण्यात आले. या सर्व शिबिरदारम्यान जि.प. शाळा खिरकडे या शाळेला सर्वोत्कृष्ट शाळेचा किताब देऊन त्यांना विविध बक्षिसे देण्यात आली.

क्रीडादिनाच्या दिवशी प्रयास स्वयंसेवकांनी भेट दिलेल्या शाळांमधून शालेय परिसर पाहणी,स्वयंपाकगृह,स्वच्छतागृह,वैयक्तिक स्वछता या मुद्यांच्या आधारावर पाच शाळांना स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार देण्यात आले.संपूर्ण शिबीरादरम्यान ‘प्रयास’ च्या प्रत्येक स्वयंसेवकांनी स्वयंशिस्तीचे अनोखे दर्शन घडवले. अखेरच्या दिवशी जातांना प्रत्येक स्वयंसेवकाच्या डोळ्यांमध्ये एक अभूतपूर्व आनंद तरळत होता.

“रायझिंग बाय लिफ्टिंग ऑदर्स” स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी पण जगाव हा ध्यास घेऊन 21 व्या शकतात संगणकाच्या युगात शून्याला ही देता येते किंमत पण शून्यासमोर एक होऊन किंमत देण्याची करावी लागते हिंमत आणि हीच हिंमत या प्रयास च्या तरुणांनी केली आहे .

सात दिवसीय शिबिराबरोबरीनेच बर्षभर ‘प्रयास’ कडून वेगवेगळे विधायक उपक्रम राबविले जातात यांमध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, दुर्गस्वच्छता, एक वही एक पेन, गणेशमूर्ती संकलन यांसारखे उपक्रम राबविले जातात.

Deshdoot
www.deshdoot.com