कर्जत उपकारागृहातून पलायन केलेले तिघे जेरबंद
स्थानिक बातम्या

कर्जत उपकारागृहातून पलायन केलेले तिघे जेरबंद

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जत येथील उपकारागृहातून रविवारी (दि. 9) रात्री पलायन केलेल्या पाच खतरनाक आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, दोघे अद्याप पसारच आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा. जवळा ता. जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव ता. जामखेड) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तर, गंगाधर लक्ष्मण जगताप (रा. म्हाळंगी ता. कर्जत) याला कर्जत पोलिसांनी मंगळवारी (दि. 11) रात्री अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता तिघांना 19 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास उपकारागृहातून न्यायालयीन कोठडीत असलेले ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप, अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत या पाच आरोपींनी कारागृहातील छताचे लोखंडी गज तोडून, छतावरील कौले काढून पलायन केले होते. आरोपी पलायनामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी कर्जत कारागृहाला भेट देऊन तपासाच्या सुचना केल्या होत्या. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह, कर्जत पोलिसांचे सात पथके कार्यरत करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कोल्हे व भोर दुचाकीवरून शिक्रापूर-चाकण रोडने जाताना दिसले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालीझ होती. निरीक्षक पवार यांनी तत्काल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस शिक्रापूर-चाकणकडे पाठविले. तसेच, वडगाव मावळ (जि. पुणे) पोलिसांशी संपर्क करून आरोपींना ताब्यात घेण्याच्या सुचना केल्या. आरोपी मोहन भोर याचा भाऊ परमेश्वर भोर हा वडगाव मावळ येथे राहत असलेल्या घरामध्ये कोल्हे व भोर या दोघांनी वास्तव केले होते. पोलिसांनी परमेश्वर भोर यांच्या घराभोवती सापळा लावून आरोपींना जेरबंद केले. तर कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या पथकाने गंगाधर जगताप याला न्हावी (ता. इंदापूर जि. पुणे) येथे जेरबंद केले.

कोल्हे, भोरला जायचे होते युपीला
रविवारी रात्री उपकारागृहातून बाहेर आलेल्या चौघांनी एक दुचाकी चोरली. दुचाकीवर चौघांनी प्रवास सुरू केला. परंतु, दुचाकी नादुरूस्त असल्याने चौघांना प्रवास अशक्य झाला. यानंतर कोल्हे व भोर यांनी दुसर्‍या दुचाकीचा वापर करून वडगाव मावळ (जि. पुणे) गाठले. येथील भोर यांच्या भावाच्या घरी कोल्हे व भोर यांनी मुक्काम केला. मंगळवारी (दि. 11) रात्री कोल्हे व भोरचा मुक्काम वडगाव मावळ येथे होता. दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि. 12) कोल्हे याच्या ओळखीचा असलेल्या उत्तर प्रदेश मधील एका हॉटेल वेटरकडे जाण्याचे नियोजन कोल्हे व भोर यांनी केले होते. बुधवारी पुणे मार्गे ते उत्तरप्रदेशला जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मंगळवारी रात्रीच त्यांना बेड्या ठोकल्या.

Deshdoot
www.deshdoot.com