जळगाव : शिवसेनेमुळे नारायण राणे रस्त्यावर : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी डागली तोफ
स्थानिक बातम्या

जळगाव : शिवसेनेमुळे नारायण राणे रस्त्यावर : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी डागली तोफ

Balvant Gaikwad

जळगाव-

कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी सरकारला साथ देण्याची गरज आहे. उपाययोजनांमध्ये कुठे त्रुटी राहत असतील, तर त्या सरकारच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. पण असे न करता नारायण राणे यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्री पद भूषवलेल्या व्यक्तीला या गोष्टी शोभत नसल्याची टीका पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी नारायण राणे हे शिवसेनेमुळेच रस्त्यावर आल्याचा हल्लाबोलही केला.राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जळगावात होणार्‍या विभागीय आढावा बैठकीपूर्वी अजिंठा विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. ना. गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केल्यानंतर पुढे म्हणाले की, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. कोरोनाचा सामना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी केली होती.

नारायण राणेंच्या या भूमिकेचा गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. ना. पाटील म्हणाले की, कोरोनाचा उद्रेक काय फक्त महाराष्ट्रात नाही. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मग अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल, तर महाराष्ट्रासोबत गुजरातमध्येही लागू करावी, उत्तरप्रदेशात तसेच दिल्लीतही लागू करावी. देशातील इतर राज्यांमध्येही ती लागू केली पाहिजे.

कोरोनाच्या आपत्तीला राजकारणाचा रंग न देता समाजसेवेच्या माध्यमातून, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या आपत्तीवर मात कशी करता येईल? यादृष्टीने सूचना त्यांनी द्याव्यात, अशी आमची अपेक्षा असल्याचेही ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शिवसेनेमुळेच राणे रस्त्यावर आले.
नारायण राणेंचे शिवसेनेशी जुने नाते आहे. शिवसेनेमुळेच ते मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे शिवसेनेशी त्यांचे प्रेमाचे नाते आहे, असा चिमटा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी राणेंना काढला

Deshdoot
www.deshdoot.com