बोला कोणती पाहिजे देशी की विदेशी !
स्थानिक बातम्या

बोला कोणती पाहिजे देशी की विदेशी !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कंजरवाडा ‘कंटेनमेंट झोन’ मध्ये दारूची सर्रास विक्री

जिल्हाधिकारी यांनी रेडझोनमधील बाधित शहरात दारू बंदीचे आदेश दिले आहे.मात्र जळगावातील कंजरवाडा परीसरात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने हा परीसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र या परीसरात रस्त्यावरच सर्रासपणे दारू विक्री केली जात आहे. रस्त्यावरच ‘बोला कोणती पाहिजे देशी की विदेशी’ अशी हाक मारून अव्वाच्या सव्वा किंमतीने विना परवाना खुलेआम दारू विक्री केली जात असल्याने परीसरातील नागरीक वैतागले असून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी याबाबत गांभीर्याने घेवून संबधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून शहरात शंभरी पार केली आहे.पण कंजरवाडा परीसरातील दारू विक्रेत्यांना कोरोनाबाबत गांभीर्य नाही. रविवारीच जाखनीनगर कंजरवाडा येथील एका 65 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर रूग्ण राहत असलेल्या गल्लीतील प्रवेश बंदसाठी बॅरेकेटींग करून पत्रे ठोकली.

परीसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत झाला तरी सुध्दा दारू विक्रेते बिनदास्तपणे ना तोंडाला मास्क, ना सोशल डिस्टेन्सिंग, ना दारूबंद, रेडझोनमधील बाधीत परीसरात जिल्हाधिकार्‍यांनी दारूबंदचे आदेश दिले होते.मात्र त्यांचे आदेश धुडकावून कंजरवाड्यात सर्रासपणे चढ्या भावाने देशी- विदेशी दारूची विक्री होत आहे.कंजरवाडा परीसरात दारूबंदी नावालाच असल्यामुळे तळीरामांना दारू उपलब्ध करून दिली जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालावे अशी मागणी जोर धरीत आहे.

शहरातील संवेदनशील भाग असलेल्या कंजरवाड्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आणखी एक दाटवस्तीचा भाग व्यापला गेला आहे. पांडे डेअरी चौकाकडून सिंधी कॉलनीकडे जातांना डाव्या हाताला असलेल्या कंजरवाड्यात पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे.

पांडे चौक ते कंवरनगर पोलीस चौकीपर्यंत रस्त्यावरच दारू विक्री केली जात आहे. हा रस्ता वर्दळीचा असतांना येणार्‍या – जाणार्‍या व्यक्तीला दारूविक्रेते बोला कोणती पाहिजे एका मिनिटात अनेक कंपीनेचे ब्रँड ची नावे सांगतात. याकडे संबधीत अधिकार्‍यांनी कानाडोळा न करता लक्ष घालावे अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

एखाद्या बाधीत रूग्णाच्या हातून दारू खरेदी ?

कंजरवाड्यामध्ये दारूचा आस्वाद घेण्यासाठी कंटेनमेंट झोन म्हणून समतानगर, तांबापूर, सम्राट कॉलनी, खंडेराव नगर, हरीविठ्ठल नगर, गेदालाल मिल, वाघ नगर, यासह शहरातील विविध भागातील काहि लोक या ठिकाणी दारू विकत घेण्यासाठी येत असतात.एखाद्या कोरोना बाधीत रूग्णाच्या हातून दारूची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एखाद्या कोरोना बाधीत रूग्णाने दारूची खरेदी केल्याचा प्रकार देखील घडू शकतो. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या भागातील दारू विक्री किमान पंधरा दिवस प्रतिबंध घालावा अशी एकमुखी मागणी वजा साकडे पोलिस प्रशासनाला केले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com