हृदयद्रावक : परप्रांतीय २ मजुरांचा रस्त्यात भोवळ येऊन पडल्याने मृत्यू

हृदयद्रावक : परप्रांतीय २ मजुरांचा रस्त्यात भोवळ येऊन पडल्याने मृत्यू

मुंबई येथे मजूर म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीयांचा आपल्या गावी उत्तर प्रदेशकडे जाताना प्रवासादरम्यान दोन वेगवेगळ्या गटातील वृद्धासह तरुणाचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यात घडली.

मुंबईहून उत्तर प्रदेशातील आजमगड व प्रतापगडकडे पायी चालत जाणार्‍या दोन गटातील वेगवेगळ्या घटनांमध्ये आशिया महामार्ग क्रमांक 46 वर दोघांचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली.कळवा मुंब्रा येथून जळगावपर्यंत ट्रकमध्ये आल्यानंतर जळगावहून मुक्ताईनगर मार्गे पायी आजमगड उत्तर प्रदेशकडे पायी चालत जाणारा रामसुमझ रामाधर रा. जफ्फरपुर पोस्ट विषम आहरोली आजमगड (उत्तर प्रदेश) याचा हरताळा फाटा जवळील हनुमान मंदिर जवळच रस्त्यातच चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला . त्याच्या सोबत त्याचे दोघे चुलत भाऊ होते. त्यास कोथळीचे पोलीस पाटील संजय चौधरी यांनी तात्काळ योगेश पाटील यांच्यासमवेत मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयlत दाखल केले.

दुसऱ्या एका गटामध्ये पती व पत्नी मुंबईहून पायी येत होते. हॉटेल फ्लोरा जवळ पत्नीसोबत येत असताना यदुनाथ राजनराम रा. भाषा पोस्ट जिल्हा प्रतापगड (उत्तर प्रदेश) त्याला चक्कर येऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला . त्याला देखील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.दरम्यान मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील व नगरसेवक राजेंद्र हिवराळे यांनी दोन्ही मयत इसमांची आधारकार्डवरून माहिती काढत उत्तर प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

तिघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले – डॉ. योगेश राणे

दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे बर्‍हाणपूर येथून आलेल्या एका बावीस वर्षीय महिलेला त्रास जाणवू लागल्याने सदर महिलेचा स्वॅब घेण्यात आला आहे .तसेच आज दुपारी उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या परप्रांतीयांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याने त्या दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांनी दिली आहे त्यामुळे आज एका महिलेसह दोन पुरुषांचे स्वॅब म्हणजेच एकूण तीन जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान परप्रांतियांच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com