जळगाव : जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 22 
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 22 

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आणखी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

भुसावळ 2 तर अमळनेरातील एकाचा मृत्यू

जिल्ह्यात आज दि.27 रोजी 4 कोरोना रुग्ण आढळून आले. यात भुसावळातील 3 तर जळगावमधील जोशीपेठेतील एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चारपैकी दोघांचा आधीच मृत्यू झाला असून त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. हे दोघेही मयत भुसावळचे आहेत. त्यामुळे आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 1 जळगाव व 1 भुसावळचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सकाळीच अमळनेरच्या एका महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची आजची संख्या 3 झाली आहे. आतापर्यंत आढळलेल्या 22 रुग्णांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला असून 1 रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून तो घरी गेला आहे.

आज आढळून आलेल्या कोरोनाबाधित 4 रुग्णांपैकी 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रुग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रुग्णाचा उपचारासाठी दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण भुसावळ येथील आहे. जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. यामध्ये 4 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 48 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अमळनेर शहरातील कोरोनाबाधित 66 वर्षीय वृद्धाचा मृत्यू रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास झाला आहे. जळगावातील कोविड 19 रुग्णालयात घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी 25 रुग्णांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. या अहवालामध्ये अमळनेर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 7 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

संशयित 34 रुग्ण दाखल

या रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत सोमवारी सायंकाळपर्यंत 183 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कोरोना संशयित 34 रुग्णांना दाखल केले. या रुग्णालयात आतापर्यंत एकूण 5295 रुग्णांचे स्क्रिनिंग झाले आहे. संशयित 52 रुग्णांचे स्वॅब घेवून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत संशयित 526 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील 395 अहवाल निगेेटिव्ह आले आहेत. तर 144 अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर 312 जणांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com