जळगाव : जिल्हावासियांना येणार ‘झीरो शॅडो डे’ चा अनुभव
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्हावासियांना येणार ‘झीरो शॅडो डे’ चा अनुभव

Balvant Gaikwad

सोमवारी दुपारी सावली काही वेळ येणार पायाशी

दैनंदिन जीवनात आपण नेहमी म्हणतो की रोज १२ वाजता सूर्य आपल्या डोक्यावर येतो. पण रोज तसे घडत नाही. असा योग वर्षातून फक्त दोनच वेळेस येतो. सौर घड्याळ (सनडायल) नुसार १२ वाजता व हातातील घड्याळानुसार (भारतीय प्रमाण वेळ) १२ वाजून काही मिनिटांनी डोक्यावर येतो आणि आपली सावली पायापाशी पडते. निसर्गाच्या या अदभूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीरो शडो डे’ असे म्हणतात. या शून्य सावली अर्थात झीरो शाडोचा अनुभव जिल्ह्यातील नागरिकांना सोमवार दि. 25 मे रोजी अनुभवता येणार आहे अशी माहिती खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी दिली.

‘शून्य सावली’चा आभास

पृथ्वी आपल्या २३.५ अंशातून झुकलेल्या अक्षासह सूर्याभोवती फिरते. पण पृथ्वीवरून बघतांना आपल्याला सूर्य कधी उत्तर तर कधी दक्षिण दिशेकडे सरकतोय असा भास होतो. ज्याला आपण उत्तरायण व दक्षिणायन म्हणतो. पृथ्वीवरील आपले भौगोलिक स्थिती निश्चिती साठी उभ्या आणि आडव्या रेशाना अक्षांश व रेखांश म्हटले जाते. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या प्रवासाच्या काळात सूर्य रोज वेगवेगळ्या अक्षांशावर (Latitude) उगवतो ज्याला ‘सूर्याची क्रांती’ (सन डेक्लीनेशन) असे म्हणतात. जळगांव शहर उत्तर गोलार्धात विषुववृत्त आणि कर्कवृत्ताच्या मध्ये २१.०० अंश उत्तर (21.00° N) या अक्षांशावर आहोत. असे प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. २१ मार्च ते २१ जून या उत्तरायणाच्या काळात २५ मे रोजी सूर्याचे डेक्लीनेशन आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. दि. २५ मे रोजी सूर्य २१.०० अक्षांशावर उगवतो त्यादिवशी १२ वाजून २४ मिनिटांनी आपण ‘शून्य सावलीचा क्षण’ अनुभवतो. २१ जून नंतर परतीच्या प्रवासात १६ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन (सूर्याची क्रांती) परत आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी देखील आपल्याकडे ‘शून्य सावलीचा क्षण’ आपल्याला अनुभवास मिळतो.

उत्तरायणाच्या काळात उत्तर दिशेकडे हळूहळू सरकतांना सूर्य एका अक्षांशावर साधारण दोन दिवस असतो. त्यामुळे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक २५ आणि २६ मे २०२० असे दोन दिवस करणार आहोत. दर वर्षीप्रमाणे यावर्षी लॉकडाऊनमुळे कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य नाही. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण आम्ही करणार आहोत. तरी सर्व खगोलप्रेमींनी या भौगोलिक घटनेचा आनंद घ्यावा.

अमोघ जोशी
खगोल अभ्यासक .

Deshdoot
www.deshdoot.com