कोविड रुग्णालयात बड्यांना वाचविण्यासाठी छोट्यांचा गेम

कोविड रुग्णालयात बड्यांना वाचविण्यासाठी छोट्यांचा गेम

कोविड रुग्णालयातील बेपत्ता पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह तब्बल 9 दिवसानंतर शौचालयात आढळून आल्याप्रकरणी गुरुवारी आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.भास्कर खैरे यांच्यासह अन्य तिघांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, या कारवाईत जाणीवपूर्वक प्रशासनातील बड्या माशांना वाचविण्यात आल्याचा संशय व्यक्त होवू लागला आहे.

कोविड रुग्णालयाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे या पूर्वी देखील पुढे आले आहे. दरम्यान अत्यंत संवेदनशील विषयात देखील राजकारण होत असल्याने कोविड रुग्णालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रुग्णांच्या जीवाशी होत असलेल्या खेळामुळे सामान्यांच्या मनात कोरोनापेक्षाही अधिक भिती कोविड रुग्णालयाची झाली आहे. खुद्द आरोग्यमंत्र्यांनी जळगावात येवून या बाबत आढावा घेतल्यानंतर आणि कडक शब्दात समज दिल्यानंतर देखील येथील परिस्थीती ‘जैसे थे’ आहे. दररोज राज्य शासनाकडे या बाबत तक्रारींचा पाढा वाचला जात आहे.

अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी तर थेट येथील प्रमुख अधिकार्‍यांच्याच बदलीची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचेकडे स्वत: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील येथील परिस्थीतीबाबत सर्व कथन केले आहे. परिस्थीती हाताबाहेर जात असतांना कोणीही गंभीर नसल्याचेच यातून दिसून येत आहे.

दररोज शंभराच्या घरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यातच पॉझिटीव्ह महिलेचा मृतदेह नऊ दिवस वॉर्डातीलच शौचालयात पडून राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे कोरोनाची साखळी तुटता-तुटत नसतांना दुसरीकडे कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. गेल्या तीन दिवसातल्या समाज माध्यमातल्या प्रतिक्रिया बघितल्यातर कोणत्याही संवेदनशिल सर्वसामान्य जळगावकराला लाज वाटेल अशा पध्दतीने प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर टिकास्र सोडले जात आहेत.

पुन्हा एकदा डॉ. खैरे चर्चेत

पॉझिटिव्ह बेपत्ता महिेलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा खैरे चर्चेत आले. खैरेवरील निलंबनाची कारवाई योग्यच आहे. मात्र जबाबदारी फक्त डीन असलेल्या खैरेंचीच होती काय? खैरे कमी पडत असल्यानेच शासनातर्फे जिल्हा रुग्णालय अर्थात कोविड रुग्णालयाच्या प्रशासकपदी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांची नियुक्ती केली आहे.

डॉ. खैरे सुरुवातीपासूनच वादग्रस्त

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिले आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचार पध्दती, वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधा तसेच इतर कारणांमुळे त्यांचेवर अनेकदा आरोप झाले आहेत. स्वॅब घेवून रुग्णांना सोडून देणे, मयत पॉझिटिव्ह रुग्णाचे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याप्रकरणी गंभीर आरोप झाल्यानंतर राज्य शासनाने त्यांच्या जागी कोल्हापूर येथील डॉ. गजभिये यांची बदली जळगावात केली होती मात्र या कारवाईतही राजकारण आडवे आल्याने गजभिये या जळगावात पोहोचत नाही तोच त्यांची बदली रद्द करण्यात आली. त्यामुळे गजभिये यांना अर्ध्या वाटेवरुनच माघारी परतावे लागले.

डॉ. सुयोग चौधरींच्या बचावासाठी आयएमए पुढे सरसावली

कारवाई झालेल्या डॉ. सुयोग चौधरी यांच्या बचावासाठी आता आयएमए पुढे सरसावली आहे. आयएमएच्या म्हणण्यानुसार डॉ.सुयोग चौधरी हे एकटेच 120 रुग्ण हाताळत होते. रुग्णांवर उपचाराची जबाबदारी ही डॉक्टरांचीच आहे मात्र गायब झालेल्या रुग्णांची शोध घेण्याची जबाबदारी डॉक्टरांसोबत इतरांचीही होती. शौचालयात 8 दिवस पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह पडून राहतो. याचाच अर्थ शौचालयाची स्वच्छताच होत नाही असा निघतो. या आठ दिवसात एकही स्वच्छताकर्मी शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वार्ड क्र. 7 मध्ये गेला नाही काय? गेला असेल तर आतून कडी लावलेल्या शौचालयाचा दरवाजा त्याने ठोठावला नाही का? दरवाजा ठोठावला असेल तर आतून काही आवाज येत नाही याचाच अर्थ काही तरी विपरित घडले असावे हे त्यांच्या लक्षात आले नाही काय? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून होईलच मात्र सध्या तरी सामान्य माणसांच्या मनात या एका घटनेने असे अनेक अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाले आहेत. बरेचदा वरिष्ठांना वाचविण्याच्या नादात कनिष्ठांचा बळी घेतला जातो मात्र या गंभीर घटनेत देखील तोच पाढा गिरवल्याचे सध्या तरी दिसत आहे.

बेपत्ता महिलेच्या तपासात पोलिसांचा हलगर्जीपणा

महिलेच्या बेपत्ता प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास जिल्हा पेठचे पो. नि. अकबर पटेल हे स्वत: करीत आहेत. तपासासाठी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्हीचा तपास 9 दिवसानंतरही पोलिसांना लागला नाही. तपास करतांना पोलिसांनी कोविड रुग्णालयाच्या परिसरात शोध घेण्याची देखील तजवीज घेतली नसल्याचेच या प्रकारावरुन उघड झाले आहे. या वृध्द महिेलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर बुधवारी पोलिस तपासासाठी वॉर्ड क्र. 7 मध्ये गेेले. त्यानंतर त्या वृध्द महिलेला शौचालयकडे जातांना एका दाम्पत्याने पाहिल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. हीच माहिती पोलिस ठाण्यात पुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच तपासात मिळू शकत नव्हती का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सदर बेपत्ता महिलेच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे जाणवत नाही का? जाणवत असेल तर पोलिसांवर कोणती कारवाई झाली.

प्रशासनावरही प्रश्नचिन्ह

जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासनाचा प्रमुख म्हणून कोरोना काळात जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर टाकण्यात आलेली आहे. ज्या प्रकारे वैद्यकीय महाविदयालयाचा प्रमुख म्हणून डीन डॉ. भास्कर खैरे यांच्यावर कारवाई झाली त्याप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची जबाबदारी होत नाही काय? यावरुन जिल्हाधिकारीही संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com