जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा,  महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद
स्थानिक बातम्या

जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद

Rajendra Patil

जि.प.च्या ग्रामीण भागातील शाळा मात्र सुरू राहतील

जळगाव
मुंबई, पुणे, नागपूर, मधील व्यायाम शाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालये या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता जळगाव जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक सरकारी, खाजगी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्र शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी काढले असून ते संबंधीत शाळा, महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.

राज्यात करोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र इ. १० वी व १२ वी च्या परिक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधीत संस्था प्रमुख यांना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबाबत व गृहपाठाबाबत व्हॉट्‌सअप ग्रुप, ईमेल व ऑनलाईन विद्यार्थी व पालक यांचे संपर्कात रहावे अशा सूचनाही संस्था चालकांना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शासनाने शाळा बंद चा आदेश जरी काढला असेल तरी पालकांनी कुठेही ही मुलांना घेऊन गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सुट्टी आहे म्हणून सहली अरेंज करू नयेत कोणत्याही यात्रेला किंवा जत्रेला जाऊ नये कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून शासनाने जी खबरदारी घ्यायला सांगितली आहे तीचे पालकांनीही तंतोतंत पान करणे गरजेचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com