Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकोरोना संशयित आणखी एका महिलेचा मृत्यू

कोरोना संशयित आणखी एका महिलेचा मृत्यू

आतापर्यंत संशयित २१ रुग्णांचा मृत्यू; सारीच्या निदानास विलंब

जळगाव  – 

जिल्हा रुग्णालयात सोमवारी जळगावातील एका ५२ वर्षीय कोरोना संशयित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या कोरोना संशयित महिला रुग्णास जिल्हा रुग्णालयात १८ रोजी दाखल करण्यात आले होते. तिचे स्वॅब घेवून ते धुळे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. परंतु, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. या महिलेस किडनी, डायबेटीस, न्युमोनिया, श्‍वसनाचा विकार होता, असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, या अगोदर अमळनेरातील एका ५२ वर्षीय कोरोना संशयित महिला रुग्णाचा रविवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेला आहे. तिचाही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

सारीबाबत अवलोकन

या रुग्णालयात आतापर्यंत कोरोना संशयित २१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यातील बहुतांश  मयत सारी आजाराचे रुग्ण होते, असा संशय आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेमार्फत कोरोना संशयित मयतांच्या केस हिस्ट्रीचा अभ्यास करण्यात येत आहे.

त्यामुळे त्यांना सारी आजाराची लागण झाली होती का? हे स्पष्ट होऊ शकेल. यासंदर्भात राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या  वरिष्ठांनी देखील अहवाल मागविला आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संशयितांच्या मृत्यूसंदर्भातील अवलोकन सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सारी आजारामुळे खरच काही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट समजू शकले नाही.

 संशयित २० रुग्ण दाखल

जिल्हा रुग्णालयात सोमवारी कोरोना संशयित २० रुग्णांना दाखल करण्यात आले. संशयित आठ रुग्णांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर १८ अहवाल प्रतीक्षेत आहेत. या रुग्णालयात आतापर्यंत कोरोना संशयित ३०४ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. यात आतापर्यंत २८१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. निकषात नसल्यामुळे संशयित दोन रुग्णांचे नमुने तपासणीसाठी नाकारण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह तीन रुग्ण आढळले.

यात मेहरुणमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश होता. त्याचे फेरतपासणीत दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सालारनगरातील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर अमळनेर तालुक्यातील मुंगसे परिसरामधील एका ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर उपचार सुरू आहेत.

 ११० रुग्णांचे स्क्रिनिंग

जिल्हा रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत सोमवारी ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण चार हजार ३३९ रुग्णांचे स्क्रिनिंग झाले आहे. तर डॉक्टरांनी आतापर्यंत एकूण २२३ रुग्णांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या