आर.के.वाइनप्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

आर.के.वाइनप्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

आर. के. वाइन प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव, मनोज सुरवाडे, भारत पाटील या पाच जणांंविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये गुरुवारी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात कलमही वाढवण्यात आले आहे.

लॉकडाऊनमधील अवैध दारुची विक्री करणारे आर.के.वाइन्सवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आर.के.वाइन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला.

या प्रकरणात काही पोलीस अधिकारी, कर्मचारीही सहभागी असल्याचा संशय प्राथमिक तपासात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी चौकशीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीची नियुक्ती केली. यात आर.के.वाइन्स अवैध मद्य प्रकरणाशी संबंध जोडलेले पोलीस मुख्यालयातील कर्मचारी मनोज सुरवाडे, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हापेठचे संजय जगन्नाथ जाधव, तर तालुका पोलीस ठाण्यातील भारत शांताराम पाटील यांच्यासह अन्य काही कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवण्यात आले होते.

बँक खात्यावर रक्कम वर्ग

दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक नवटके यांनी केलेल्या चौकशीअंती पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह इतर कर्मचार्‍यांची आर.के.वाइन या दारू विक्री दुकानात भागीदारी असल्याचे व दुकान मालक दिनेश नोतवाणी यांच्या खात्यातून संंबंधित कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर काही रक्कम वर्ग झाल्याची माहिती पुढे आली.

त्यानंतर या पाचही जणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम क, 65 (इ), 82, 83 सह साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 चे कलम 3 आदेशाचे उल्लंघन. भादंवि कलम 188, 269, 270 व आपत्ती व्यवस्थापन कलम 91 (ब) प्रमाणे वाढीव कलम महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम 1949 चे कलम 81, 72, 75, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 145 (क), भादंवि कलम 114, 116 प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आता वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com