जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले 20 करोना बाधित रुग्ण
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले 20 करोना बाधित रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगावात एका डॉक्टरचाही समावेश ; जामनेर तालुक्यातही एन्ट्री

जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले. यातील 25 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 20 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, चोपडा येथील एक, पळासखेडे (ता.जामनेर) येथील एक, यावल तालुक्यातील दोन, गांधी चौक, सावदा येथील दोन, तर जळगाव शहरातील पोलीस कॉलनीतील दोन आणि सिव्हील हॉस्पिटलमधील एका कनिष्ठ डॉक्टर अधिकार्‍याचाही समावेश आहे. तसेच यापूर्वीच कोरोना बाधित असलेल्या भुसावळ, अमळनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचे पुनर्तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 317 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. तर आतापर्यंत 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असेही डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले

पोलिसाच्या कुटुंबातील सदस्य क्वाारंटाइन

जळगाव शहरातील पोलीस दलामधील एका कर्मचार्‍याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या कर्मचार्‍याच्या दक्षतानगरातील पोलीस लाइनमधील कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

तसेच शहरातील अक्सानगरातील 59 वर्षीय पुरुष, शाहूनगरामधील 34 वर्षीय महिलेस शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांचे मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आले.

तसेच वाघनगर परिसरातील एका 50 वर्षीय रुग्णाला शनिवारी रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यांचाही अहवाल मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे या रुग्णाच्या घराजवळील परिसर सील करण्यात आला आहे. या अगोदर वाघनगराजवळील काही अंतरावरील श्रीधरनगर परिसरातही एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे श्रीधरनगरामधील देखील काही भाग सील करण्यात आला आहे.

नवीन भागात सर्वेक्षण

मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जळगाव शहरातील पोलीस कॉलनीतील दोन आणि सिव्हील हॉस्पिटलमधील एका कनिष्ठ डॉक्टर अधिकार्‍याचाही समावेश आहे. त्यामुळे हा परिसरातील काही भाग सील केला आहे.

जळगाव शहरात महापालिका प्रशासनाने आतापर्यंत एकूण 30 भाग सील केले आहे. नवीन रुग्ण आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरात युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात येत आहे. त्या भागात सर्वेक्षण करुन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे, असे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com