Video : समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज – आयुक्त नांगरे-पाटील
स्थानिक बातम्या

Video : समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज – आयुक्त नांगरे-पाटील

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । खंडू जगताप 

मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कायम तत्पर आहेतच, परंतु पुरुषी मानसिकता बदलत नाही, समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हैदराबाद, मध्यप्रदेशसारख्या घटना होतच राहतील. वयात येताना मुलांना योग्य प्रकारे लैंगिक प्रशिक्षण देऊन त्यांना महिलांचा आदर करण्याची शिकवण देणे गरजेचे असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.
हैदराबाद तसेच मध्यप्रदेश येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणांनी देश हादरला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व येथील महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना नांगरे-पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, नाशिक हे विकसीनशील शहर असून येथील महिला, मुली नक्कीच सुरक्षितता अनुभवतात. कोणत्याही घटकांकडून तुम्हाला त्रास होत असल्यास आपले माहेर समजून पोलीस ठाण्यात यावे.पोलीस आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असतील. नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. प्रामुख्याने निर्भया पथके अधिक सज्ज करण्यात आली असून शेकडो टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात 500 ब्लॅक स्पॉट शोधले असून या ठिकाणी निर्भया तसेच बीट मार्शलची नियमित गस्त चालू आहे. निर्भया पथकातील पोलीस महिला साध्या वेशात अशा भागात जाऊन टवाळखोरांकडून त्रास होताच गुप्त चित्रिकरण करून त्यांना धडा शिकवत आहेत. याशिवाय शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन दररोज निर्भया पथके मुलांची जनजागृती करत आहेत. निर्भयाचा टोल फ्री क्रमांक 1091 हा सर्वाधिक जलद प्रतिसाद या यादीत आहे. अवघ्या काही मिनिटांत महिलांना आहे त्या ठिकाणी मदत दिली जात आहे.

आयुक्तालयातील महिला कक्ष सक्षम करण्यात आला असून महिलांची तक्रार येताच याची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे. यासह महिलांना मानसिक आधार देण्यासाठी या कक्षात व्यावसायिक तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतो, यासह येथील अधिकारी व सेवकांना तसे प्रशिक्षण दिले गेले आहे. यासह त्या त्या भागातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला व मुलींच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाईचे आदेश दिलेले आहेत.

मुली व महिला बदनामी व समाजाच्या भितीने पोलीस ठाण्यात येण्याचे टाळतात. परंतु याचा गैरफायदा टवाळखोर घेऊन पुढचे पाऊल उचलतात यामुळे पहिल्यांदाच पोलिसांची मदत घेतली तर पुढील अनर्थ टाळता येतील.

स्वरक्षणासाठी सज्ज व्हा

मुली व महिलांसाठी कायद्यांमध्ये मोठे बदल होत आहेत. पोलीस म्हणून आम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर आहोतच, परंतु स्वरक्षण, बचावासाठी त्यांना तयार केले पाहिजे. मुलींना तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्या कोणाचा मुकाबला करू शकणार नाहीत. या तीन दिवसांत अशा प्रसंगातून सुटका करून घेण्याचे प्रशिक्षण देता येईल. तर मार्शल आर्ट, कराटेसारखे स्वरक्षणाचे वर्षभराचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. हा सर्व शिक्षणाचा भाग व्हावा असे नांगरे पाटील यांनी नमुद केले.

सर्व विभागांच्या समन्वयाचा प्रयत्न

शासनाचे विविध विभाग महिलांसाठी कार्य करत असतात. यामध्ये पोलिसांसह, महिला कक्ष, महिला व बालकल्याण विभाग, कौटुंबिक न्यायालये, शीघ्रगती न्यायालये, महिला आयोग असे महिलांसाठी काम करणार्‍या सर्व विभागांचा समन्वय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेणेकरून महिलांना सर्व मदत एकाच ठिकाणी व वेळेवर मिळेल.

कुटुंबांपासून प्रारंभ व्हावा

मुले वयात येताना त्यांच्यावर घरातील वातावरणाचा प्रभाव पडत असतो. पालक कसे वागतात. महिलेला घरात कसे वागवले जाते, त्यांचा आदर केला जात नसेल तर मुले बाहेरील महिलांबाबतही वाईट कमेंट पास करण्यास सुरुवात करतात. त्यांना वेळीच लैंगिक शिक्षण दिले गेले नाही तर चित्रपट, मालिका, सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून मिळणार्‍या चुकीच्या माहितीच्या आहारी जाऊन नको ती कृत्य करतात. यासाठी वयात येणार्‍या मुलांना वेळीच योग्य मार्गदर्शन, शिक्षण देण्याची जबाबदारी पालक तसेच शिक्षण संस्थांची आहे. कुटुंबापासूनच याची सुरुवात झाल्यास त्यांची मानसिकता बदलेल.

वेळीच नाही म्हणायला शिका

मुली अनेकदा मित्रांमध्ये अगर अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यास बळी पडतात. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग गोड बोलून अगर, ईमोश्नल ब्लॅकमेल करून, जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पुढील व्यक्तीचा हेतू ओळखून पहिले बोलणे बंद करा. दुसरे वेळीच नाही म्हणायला शिका, याचा परिणाम नाही झाला तर कसलीही भीती न बाळगता पोलिसांकडे जाऊन तक्रार करायला शिका. पोलीस आपली बदनामी न होऊ देता मदत करतील व पुढील अनर्थ टळतील.

Deshdoot
www.deshdoot.com