अमेरिकेतील भारतीयांना मातृभूमीची चिंता; लॉकडाऊनचे पालन करा देश प्रेम जागवा – स्नेहलताई शिंदे

jalgaon-digital
2 Min Read

नगर / कॅलिफ़ोर्निया 

‘कोरोना’ मुळे जगाची तसेच भारताची परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. त्यामुळे आम्ही अमेरिकेत असूनही दररोज भारतातील परिस्थितीची महिती घेतो. त्यामुळे आम्हाला आमच्या मातृभूमीची चिंता वाटत आहे, असे भावनिक उदगार काढून भारतीयांनी लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे रहिवासी असलेल्या मूळच्या नगरच्या असलेल्या स्नेहलताई शिंदे यांनी केले.

त्या माजी खासदार शंकरराव काळे यांच्या कन्या असून अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या आहेत.

दिवंगत शंकरराव काळे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील आप्तेष्टांशी एका चित्रफ़ीतीद्वारे संवाद साधताना त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, अमेरिका वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड विकसित आहे, तरीसुद्धा ही परिस्थिती उद्भवली आहे येथे मोठ्या प्रमाणात चाचण्या घेतल्या जात आहेत.

त्यामुळे रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे, भारतात त्या प्रमाणात चाचण्या अजून झाल्या नाहीत. कदाचित यानंतर खरी परिस्थिती समजून येईल.

भारतात लॉकडाउनचे व्यवस्थित पालन केले नसल्याचे आम्हाला समजते. काही तरुण आपल्या वयाचा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा फाजील आत्मविश्वास बाळगतात व घराबाहेर पडतात.

परंतु, आपल्या कुटुंबात लहान मुले, वृद्ध आहेत ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे. याचे भान राखले जात नाही. त्यांना त्याची बाधा होते, हे लक्षात घ्यायला हवे, असे त्या म्हणाल्या.

नगर जिल्ह्यातील अनेक जण अमेरिकेत असून कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची दिलासादायक माहिती त्यांनी दिली. भारतीय लोकांना लॉकडाउनचे तंतोतंत पालन करावे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

जग एका मोठ्या संकटातून जात असून याचे दूरगामी परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. भारतीयांनी जगातील कोरोनाचा हाहाकार लक्षात घेऊन काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. आपणास देशाविषयी प्रेम व्यक्त करण्याची हिच वेळ असल्याची साद त्यांनी देशवाशीयांना घातली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *