तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय; मालिकाही खिशात
स्थानिक बातम्या

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय; मालिकाही खिशात

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

न्युझीलंड : न्युझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्याच्या सुपर ओव्हरमध्ये भारताने रोमहर्षक विजय संपादन केला. रोहित शर्माने अखेरच्या दोन चेंडूवर लगावलेल्या दोन षटकारांनी सामन्यासह मालिका खिशात घातली.

सुरुवातीला न्युझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र, भारताच्या सलामी जोडीने म्हणजे रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी साजेशी सुरुवात करून दिली.

दरम्यान, राहुल आणि शर्मा यांची विकेट गेल्यानंतर शिवम दुबे आणि श्रेयसदेखील माघारी परतले. यानंतर मैदानात उतरलेल्या कप्तान विराट कोहलीने अखेरच्या षटकांत सावध खेळी करत भारताची धावसंख्या १७९ धावांपर्यंत नेली. मधल्या फळीचे फलंदाज अयशस्वी ठरल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

यानंतर १८० धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजीसाठी आलेल्या न्युझीलंड संघाने सावध खेळी केली. भारताच्या गोलंदाजांनी वेळोवेळी न्युझीलंडला झटके दिले.

मात्र, कप्तान केन विल्यम्सन याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ९५ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांत मोहम्मद शमीच्या हाती चेंडू विराटने सोपवला होता. या षटकांत केन विल्यम्सनचा बळीघेण्यात शमीला यश आले. यामुळे सामन्याला वळण मिळाले; भेदक गोलंदाजी करत शमीने अखेरच्या चेंडूवर रॉस टेलरचाही बळी टिपला. यामुळे सामना टाय झाला.

यानंतर सुपर ओव्हरसाठी न्युझीलंडचा संघ मैदानात उतरला. बूमराहच्या हातात कप्तान विराट कोहलीने चेंडू दिला. या षटकांत संपूर्ण ओव्हरमध्ये न्युझीलंडने १७ धावा काढल्या. सहा चेंडूत १८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामी जोडीने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या.

दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर राहुलने चौकार खेचला. चौथ्या चेंडूवर एक धाव दिल्यानंतर पुन्हा स्ट्राईक रोहित शर्माकडे आली.

तेव्हा भारताला २ चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. अखेरच्या दोन्ही चेंडूवर दोन उत्तुंग षटकार खेचत रोहित शर्माने भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारताने टी२० पाच सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकत मालिका भारताने खिशात घातली.

Deshdoot
www.deshdoot.com