Photo Gallery : नाशिकसह जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
स्थानिक बातम्या

Photo Gallery : नाशिकसह जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी यासाठी शासनाने ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजना 2019 च्या रुपाने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन कटिबध्द असल्याचे, प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी जनतेला शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरिक्षक छोरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, महाराष्ट्र प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचेसह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.

यावेळी ना. भुजबळ म्हणाले, कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कमी वेळेत कार्यवाही पूर्ण केली असून जिल्ह्यातील एक लाख 36 हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. गरीब व गरजु जनतेसाठी ‍’शिवभोजन’ थाळीचा शुभारंभ आज होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती यशावकाश वाढवली जाणार असून जिल्ह्यात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब व गरजू नागरिकांना चांगल्या दर्जाचे जेवण कमी दरात देण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीयस्तरावर ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण विभाग पातळीवर कमी वेळात होणार आहे. त्याचप्रमाणे सेवा हमी कायद्यामधील पूर्वीच्या 20 व नव्याने देण्यात येणाऱ्या 81 सेवा मिळून सेवांची शंभरी गाठणारा नाशिक हा राज्यातील प्रथम व एकमात्र जिल्हा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद करुन पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनदंन केले.

पोलीस विभागामार्फत महिला सुरक्षितेतेसाठी राबवल्या जाणाऱ्या निर्भया योजनेचे काम उत्कृष्ट असून ‘भरोसा सेल’ व क्यूआर कोडच्या आधारे करण्यात येणाऱ्या पर्यवेक्षणामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याने 150 व्या वर्षात पदार्पण केले असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याची गुणवैशिष्टे व शक्तिस्थळे संपूर्ण जगासमोर मांडण्यासाठी नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

कार्यक्रमात पालकमंत्री महोदयांचे हस्ते पोलिस विभागाच्या मॅरेथॉन वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. यावेळी परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

संचलनात पोलीस आयुक्तालय नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्नीशामक दल, भोसला मिल्ट्री स्कुलचे आर्मी ,नेव्हल विंग व एअर विंग तसेच अश्वदल, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन वाहन, वरुण वाहन, वज्र वाहन, पोलीस बँड, श्वान पथक, जलद प्रतिसाद पथक, महिला व बाल विकास विभाग आदी पथकांनी सहभाग घेतला.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री यांच्या हस्ते गुणवंत क्रिडा संघटक मिनाक्षी गवळी व आदिती सोनवणे, सुलतान देशमुख, सागर बोडके, मिताली गायकवाड यांना गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पोलिस आयुक्तालय नाशिक शहर यांचेवतीने गुणवत्ता पुर्ण सेवेसाठी पोलीस पदक देऊन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मेहबुब आली सैय्यद, पोलीस हवालदार संजय वायचळे व गडचिरोली येथे विशेष सेवा दिल्याने विशेष सेवा पदक सुकदेव सुतार यांना देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते पोलिस उपअधिक्षक, समिरसिंह साळवे, सहा.पोलीस उपनिरीक्षक विष्णू गोसावी व पोलीस निरीक्षक स्वप्नील कोळी यांना सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षण संस्थेत उत्कृष्ट सेवा बजाविल्याने बाह्य वर्गमधून केंद्रीय गृह मंत्री यांचे उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक पदक व प्रशस्तीपत्रक देऊन पोलिस नाईक सुनिल कनोजिया व पोलीस हवालदार देविदास वाघ यांना सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

ध्वजारोहणानंतर देशाच्या संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात सेंट लॉरेन्स हायस्कुल ॲण्ड ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुहनृत्य व समुहगीत सादर केले. आदर्श माध्यमिक विद्यालयाने देशभक्तीपर समुहनृत्य सादर करुन उपस्थितांची मते जिंकली.

Deshdoot
www.deshdoot.com