नंदुरबारात आणखी तिघे कोरोनाबाधीत
स्थानिक बातम्या

नंदुरबारात आणखी तिघे कोरोनाबाधीत

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहरात दोन दिवसांपुर्वी सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या अन्य तीन नातेवाईकांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या चार झाली आहे. आज कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या तिघा व्यक्तींमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.

नंदुरबार शहरात दोन दिवसांपुर्वी वॉर्ड क्रमांक 10 मधील 48 वर्षीय रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटूंबासह संपर्कात आलेल्या 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आज यातील काही रुग्णांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले आहे. त्यात त्या रुग्णाच्या तीन नातेवाईकांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह निघाला आहे. यात तिघांमध्ये एक 65 वर्षाची महिला, 15 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. या तिन्ही व्यक्तींना यापूर्वीच क्वॉनंटाईन करून आवश्यक उपचार सुरू करण्यात आले होते. आज आलेल्या अहवालापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्ण रहात असलेला भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात साधारण साडेनऊशे कुटुंब असून 4632 नागरिक राहतात. या क्षेत्राला 18 उपक्षेत्रात विभागण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी एक पथक कार्यरत करण्यात आले आहे.

प्रत्येक उपक्षेत्रात नगर पालिका कर्मचारी किंवा शिक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक सकाळी 8 ते 10 या वेळेत येथील रहिवाशांकडून आवश्यक वस्तूंची माहिती घेतील आणि सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान या वस्तू घरपोच पोहोचविण्यात येतील. दूधाचे वितरण घरोघरी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येत आहे.

प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जावू नये आणि कोणत्याही कामासाठी बाहेर पडू नये. त्यांना समस्या असल्यास मंडळ अधिकारी झेड.एम. पठाण यांना 9145202205 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com